अबब… पुणेकरांना ठोकला २८८ कोटींचा दंड..!

पुणेकरांवर कोट्यावधी रुपयांचा दंड ठोकणाऱ्या पुणे पोलीसांना हा दंड वसूल कसा करायचा असा प्रश्न आहे. पोलीस हा दंड वसूल करण्यासाठी रस्त्यावर उभा राहत आहेत. वाहन चालकांना पकडले जात आहे. त्यामाध्यमातून त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली जाते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर किती दंड आहे हे पाहिले जाते.

  अक्षय फाटक, पुणे :  पुणे पोलीसांच्या वाहतूक विभागाची “तिसऱ्या डोळ्यांच्या” माध्यमातून गेल्या काही वर्षांत कोटींची उड्डाणे घेऊन पुणेकरांचा “खिसा रिकामा” करू लागल्याचे आता गमतीने म्हणण्याची वेळ आली आहे. गेल्या तीनच वर्षातील ही आकडेवारी पाहिल्यानंतर पुणेकरांचे “डोळे” गरगरल्याशिवाय राहणार नाहीत. कारण, बेशिस्त अन हेल्मेट परिधान न करणाऱ्या पुणेकरांवर पोलीसांनी तीन वर्षात तब्बल “दोनशे ८८ कोटीं”चा दंड ठोकला आहे. यामुळे खड्याखुड्याच्या रस्त्यांवर आणि कितीही घाई असली तरी फुलट्राफिक जाममधून वाहने घेऊन फिरावे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  पुण्याच्या वाहतूकीने आता मुंबईला देखील मागे टाकले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासोबतच बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस आघाडीवर आहेत. शहरात मार्च २०१७ पासून ई-चलननुसार कारवाई सुरू झाल्यानंतर सीसीटीव्हीद्वारे बेशिस्त टिपून त्यांना चलन मोबाईलवरच पाठविले जात आहे. त्यानुसार या कारवाईला मोठा वेग आला असल्याचे पाहिला मिळत आहे. रस्त्यावर उभा राहून कारवाई करण्यासाठी मनुष्यबळामुळे मर्यादा येत असत. तर, खाबू गिरी देखील होत असत. त्यामुळे सीसीटीव्हीचे जाळे पसरल्यानंतर या कारवाईला मोठा वेग आला आहे.

  पुणेकर मात्र, कारवाईने बेजार झाल्याचे आता पाहिला मिळत आहे. सर्वाधिक कारवाया या हेल्मेट परिधान न केल्याच्या केल्या जात आहेत. त्यामुळे पुण्यात “हेल्मेटसक्ती” असल्याचे म्हणावे लागत आहे. एकीकडे पुणेकर दररोजच्या वाहतूक कोंडीने मेटाकुटीला आलेले आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस व प्रशासन अनेक प्रयत्न करत आहे. तरीही ते अद्यापही शक्य झालेले नाही. वाहनांनी तुडूंब भरलेल्या रस्त्यांवरून खड्याखुड्यातून पुणेकरांना वाट काढावी लागते. त्यानंतर पुणेकर इच्छितस्थळी पोहचतात. त्यातही सकाळी आणि सायंकाळी विचारायलाच नको. तुम्हाला टाईमिंगला पोहचण्यासाठी किमान एक तास आधी बाहेर पडावे लागते. दररोजच हा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांना दंड ठोकणारे पोलीस अधून-मधूनच चौकात उभाराहून वाहतूक सुरळीत करताना दिसत असतील. परंतु, हेच पोलीस दररोज कुठेना कुठे कोपऱ्यात उभा राहून कारवाई करताना मात्र, हमखास दिसतात. एकीकडे अचानक सिग्नल लागल्याने चौकात झेब्रा क्रॉसिंगवर वाहन घेऊन उभारलेल्या पुणेकरांना तिसरा डोळा लगेच टिपतो अन दंडाचे चलन पाठवितो. त्यामुळे या दंडाचा आकडा मोठा वाढत आहे.

  दंड वसूलीचा प्रश्न…
  पुणेकरांवर कोट्यावधी रुपयांचा दंड ठोकणाऱ्या पुणे पोलीसांना हा दंड वसूल कसा करायचा असा प्रश्न आहे. पोलीस हा दंड वसूल करण्यासाठी रस्त्यावर उभा राहत आहेत. वाहन चालकांना पकडले जात आहे. त्यामाध्यमातून त्यांच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली जाते. त्यावेळी त्यांच्या वाहनावर किती दंड आहे हे पाहिले जाते. त्यानंतर त्यांच्याकडून पुर्वीचा दंड वसूल केला जात असल्याचे अनेकांचा अनुभव आहे. तर, वाहने उचलून नेल्यानंतर देखील त्यांच्याकडून थकीत दंड वसूल केला जात आहे. हा दंड ऑनलाईन भरून घेतला जोत.

  क्रेनने दुचाकी उचलली ४६०
  शहरात गेल्या तीन ते साडे तीन वर्षांपासून क्रेनने (टोईंगव्हॅन) नो-पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी वाहने उचलून नेण्यात येत आहेत. हे टेंडर नागपूरस्थित कंपनीला दिलेले आहे. एक दुचाकी उचलून आणल्यानंतर वाहन चालकांना ४६० रुपयांचा दंड केला जातो. पुर्वी २०० रुपये दंड होता. मात्र, टेम्पोच्या आगमनानंतर हाच दंड डब्बल झाला आहे. या टेम्पोला यातील निम्मे पैसे नियमानुसार पोलीसांकडून दिले जातात. त्यामुळे पुणेकरांना आणखीनच दंडाचा भुरदंड पडला आहे.

  जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९
  पेंडीग- ६६ कोटी ४६ लाख ३१ हजार ५०
  पेड- ४३ कोटी २५ लाख १९ १५४
  एकूण- १ अब्ज ९ कोटी ७१ लाख ५० हजार २०४

  जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२०
  पेंडीग– ५७ कोटी २८ लाख ३२ हजार ३००
  पेड–२३ कोटी १७ लाख ४ हजार ४५३
  एकूण– ८० कोटी ४५ लाख ३६ हजार ७५३

  जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२१
  पेंडीग- ८१ कोटी ५९ लाख ६९ हजार ३००
  पेड– १६ कोटी ९८ लाख ६७ हजार ८५०
  एकूण– ९८ कोटी ५८ लाख ३७ हजार १५०

  हेल्मेट–
  २०१९– केसेस– १७०५९००– दंड–८५२९५०००
  २०२०–केसेस–१०६८१६–दंड–५३४०८०००
  २०२१–केसेस–१२९३३९८–दंड–६४६६९९३००

  झेब्रा क्रॉसिंग–
  २०१९– केसेस– ५९९३१– दंड–११९८६२००
  २०२०–केसेस–७२२५५–दंड–१४४५१०००
  २०२१–केसेस–१०१३६५–दंड–२०२७३०००

  वाहन परवाना नसणे–
  २०१९– केसेस– २०७१९– दंड–१०३५९५००
  २०२०–केसेस–१७७५१–दंड–८८७५५००
  २०२१–केसेस–१८४४२–दंड–९२०९०००