कोविड -१९ चे नियम तोडणाऱ्यांवर कवठे येमाईत भरारी पथकाची दंडात्मक कारवाई

कवठे येमाई : देशभरात कोरोना महामारीचा कहर सुरु असताना नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून प्रशासन अनेक उपाययोजना व सूचनांचे अवलंबन करीत असताना सुशिक्षित व बेजबाबदार नागरिक मात्र प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचना,आदेशाला झुगारून कोरोना बाधित रुग्ण असललेल्या गावात शासनाने प्रतिबंधीत क्षेत्र घोषित केलेले असताना ही मास्क न लावता फिरणे, अधिक लोकांचा समूह करणे,अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसाय बंद ठेवण्याचे प्रशासनाकडून स्पष्ट आदेश असताना चोरून लपून व्यवसाय करणे यातून नागरिकांचा एकमेकांशी संपर्क होत असल्याने नियम तोडणाऱ्या नागरिकांना धडा शिकविण्यासाठी शिरूर तालुक्यात भरारी पथके स्थापन करण्यात आली असून काल दि. १५ ऑगस्टला दुपारी कवठे येमाईत कोविड १९ च्या संदर्भातील सूचना व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.     

नियम तोडणाऱ्यांकडून २ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. भरारी पथक गावात आल्याची माहिती गावात पसरताच अनेक मोकाट फिरणारांची,मास्क न वापरणारांची पळापळ झाली तर अत्यावश्यक सेवा वगळून सुरु असलेली इतर दुकाने पटापट बंद झाली. कोविड – १९ चे नियम व सूचना न पाळणाऱ्यांवर प्रशासनाकडून यापेक्षा ही अधिक कडक कारवाई करण्याची अपेक्षा काही सुजाण नागरिकांनी व्यक्त केली आहे.