विद्यार्थी शालेय साहित्याच्या तरतुदीतून डस्ट बीन, पुशकार्टची होणार खरेदी

दोन वर्षांपूर्वी देखील ओला - सुक्या कचऱ्यासह घरगुती घातक कचऱ्यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाला तीन डस्ट बीन देण्याचे नियोजन केले होते. पण, वाढत्या विरोधामुळे हा विषय पाठीमागे पडला होता. आता डस्ट बीन, पुशकार्टच्या लेखाशिर्षात तरतूद वाढविल्याने पुन्हा डस्ट बीन, पुशकार्ट खरेदीसाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.

    पिंपरी: विद्यार्थ्यांची पादत्राणे, बुटमोजे, पीटी शूज, दफ्तरे, पाट्या, वह्या खरेदी, वॉटर बॉटल, व्यवसाय, स्वाध्यायमाला खरेदीसाठी असेलेली ८ कोटी ८४ लाख ५० हजार रुपयांची तरतूद डस्ट बीन, पुशकार्ट खरेदीसाठी वापरण्याचा निर्णय पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने घेताना घेतला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा डस्टबीन, पुशकार्ट खरेदीसाठी हालचाली आरंभल्या आहेत.

    महापालिकेच्या २०२१ – २२ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात डस्ट बीन, पुशकार्टच्या लेखाशिर्षावर १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. भाजपने त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ८ कोटी ८४ लाख ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांची शालेय साहित्यावरील तरतूद वळविली आहे. विद्यार्थी पादत्राणे आणि मोजे खरेदीसाठी १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद होती. त्यातील १ कोटी २४ लाख रुपये घट केले. विद्यार्थी पीटी शूजसाठी १ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद होती. त्यातील १ कोटी २४ लाख रुपयांची घट केली आहे.

    दफ्तरे आणि पाट्या खरेदीसाठी २ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची तरतूद होती. त्यातील २ कोटी ४६ लाख ५० हजार रुपये घट केले. वह्या खरेदीसाठी असलेल्या २ कोटी २० लाख रुपये मूळ तरतुदीतून १ कोटी ४० लाख रुपयांची घट केली आहे. वॉटर बॉटलसाठीच्या २ कोटी तरतुदीतील १ कोटी ९० लाख रुपयांची रक्कम घट केली आहे. व्यवसाय, स्वाध्यायमालासाठी असलेल्या १ कोटी ३२ लाख तरतुदीतून ६० लाख रुपयांची रक्कम घट केली. असे एकूण विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावरील ८ कोटी ८४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम डस्ट बीन, पुशकार्टवर सत्ताधाऱ्यांनी उपसूचनेद्वारे वळविली आहे.

    दरम्यान, पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या २५ लाखांच्या घरात आहे. महापालिका हद्दीत प्रतिदिन सुमारे ८५० टनहून कचऱ्याची निर्मिती होते. शहरातून वेगवेगळ्या क्षेत्रातून घनकचरा दररोज मोशी कचरा डेपो परिसरात आणला जातो. तर, औद्योगिक, व्यापारी मालमत्तांसह निवासी मालमत्तांची संख्या सुमारे सव्वा पाच लाख आहे. निवासी घरांमधील कचरा ओला आणि सुका या पद्धतीने विलगीकरण करून गोळा करणे बंधनकारक आहे. महापालिकेने पाच वर्षांपूर्वी ओला कचरा आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी २९ कोटी रुपये खर्च करून डस्ट बिन खरेदी केले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी देखील ओला – सुक्या कचऱ्यासह घरगुती घातक कचऱ्यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाला तीन डस्ट बीन देण्याचे नियोजन केले होते. पण, वाढत्या विरोधामुळे हा विषय पाठीमागे पडला होता. आता डस्ट बीन, पुशकार्टच्या लेखाशिर्षात तरतूद वाढविल्याने पुन्हा डस्ट बीन, पुशकार्ट खरेदीसाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे.