ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह ; शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचे वक्तव्य

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना मातोंडकर यांनी यावर राऊतच अधिक माहिती देतील असे सांगितले. कारण त्यांना तो अधिकार आहे. मात्र, शिवसेनेत नसलेल्या व्यक्तींनी त्यावर भाष्यच करू नये.

    पुणे : ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय नेतेमंडळींवर सुरु असलेल्या धडक कारवायांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक देखील घडताना पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शरसंधान साधले आहे. पुण्यात उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली. हे अभियान राज्यभर १२ जुलै ते २४ जुलै राबविले जाणार आहे. शिवसेना पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. राज्यात ईडीकडून सुरु असलेल्या धडक कारवायांवर भाष्य करताना मातोंडकर म्हणाल्या, ईडीकडून ठराविक लोकांवर आणि वेळ साधून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ईडीच्या तपासावर प्रश्न निर्माण होत आहे.

    पुढे त्या म्हणाल्या, जिथे जिथे महाराष्ट्रमध्ये महिलांवर अन्याय होतो. त्यांच्या मागे लढायला शिवसेना आहे. संघटना काय आहे हे सत्तेत असताना जास्त चांगले कळते. आजच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या एवढा चांगला मुख्यमंत्री मिळाला नसता.जितकी शिवसेनेची महिला आघाडी सक्षम आहे. तितकी दुसरी कोणत्या पक्षाची महिला संघटन मजबूत नाही.सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या काय चालले आहे याची जाण असणं युवापिढीसाठी गरजेचं आहे. शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चेवर आपलं मत मांडताना या चर्चा केवळ प्रसारमाध्यमात आहेत. तुम्ही लोकं यावर चर्चा करत आहात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    संजय राऊत ‘रॉक स्टार’…
    भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेवर बोलताना मातोंडकर यांनी यावर राऊतच अधिक माहिती देतील असे सांगितले. कारण त्यांना तो अधिकार आहे. मात्र, शिवसेनेत नसलेल्या व्यक्तींनी त्यावर भाष्यच करू नये. आणि संजय राऊत हे अनेक लोकांच्या टीका झेलून चोरावर मोर आहेत. ते ‘रॉक स्टार’ आहे. अशा शब्दात वाघ यांच्यावर निशाणा साधला. तसेच आगामी निवडणुकांमध्ये आघाडी की स्वबळावर लढायचं हे नेतृत्व ठरवेल असेही त्यांनी सांगितले.