राहुल शेट्टी खून प्रकरण : मुख्य हल्लेखाेर पोलिसांच्या ताब्यात ; पुण्यात सापळा लावून केली अटक

लोणावळा : शिवसेनेचे माजी लोणावळा शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी हत्या प्रकरणातील मुख्य हल्लेखाेर इब्राहिम युसुफ खान (वय ३०, रा. सैय्यदनगर, हडपसर. मूळ रा. शहावली मोहल्ला, कब्रस्थानसमोर लातूर) व मोहन उर्फ थापा देवबहाद्दर मल्ला (वय ४७, रा. बॅटरीहिल, खंडाळ. मूळ रा. लुंबिना, नेपाळ) या दोघांना लोणावळा शहर पोलिसांनी पुण्यात सापळा रचून अटक केली.

लोणावळा : शिवसेनेचे माजी लोणावळा शहरप्रमुख राहुल उमेश शेट्टी हत्या प्रकरणातील मुख्य हल्लेखाेर इब्राहिम युसुफ खान (वय ३०, रा. सैय्यदनगर, हडपसर. मूळ रा. शहावली मोहल्ला, कब्रस्थानसमोर लातूर) व मोहन उर्फ थापा देवबहाद्दर मल्ला (वय ४७, रा. बॅटरीहिल, खंडाळ. मूळ रा. लुंबिना, नेपाळ) या दोघांना लोणावळा शहर पोलिसांनी पुण्यात सापळा रचून अटक केली. या घटनेतील चार आरोपींना लोणावळा पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँवत म्हणाले, राहुल शेट्टी यांची हत्या झाल्यानंतर त्यांची पत्नी सौम्या राहुल शेट्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज आगरवाल व दिपाली भिल्लारे या दोघांना त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. त्यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र या घटनेतील मुख्य मारेकरी याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर होते. मात्र घटनास्थळावरून उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहितीच्या आधारे लोणावळा पोलिसांनी हत्येचा छडा लावला. गुन्ह्यातील अजून तीन आरोपी फरार असून त्यांच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली असल्याचे काँवत यांनी सांगितले. दरम्यान कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी लोणावळ्यात भेट देत घटनेचा आढावा घेत तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.

गाेळीबार करुन कुऱ्हाडीने हल्ला
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व सहायक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकातील पोलीस नाईक नितिन सुर्यवंशी, वैभव सुरवसे, मनोज मोरे, राजेंद्र मदने, अजिज मेस्त्री, राहुल खैरे, पवन कराड यांच्या पथकाने पुण्यात सापळा लावत दोन्ही मुख्य आरोपी ताब्यात घेतले. त्यांनी राहुल शेट्टी यांच्यावर गोळीबार करून कुऱ्हाडीने हल्ला केल्याची कबुली दिली. मात्र त्यांनी ही हत्या का व कोणाच्या सांगण्यावरून केली, यामागे काही राजकीय हेतू आहे का ? गुन्ह्यात वापरलेले पिस्टल याचा तपास सुरू आहे.

अटक आराेपीत शिवसेनेचे पदाधिकारी
अटक करण्यात आलेले दोन आरोपी शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यातील मोहन मल्ला हा प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी उपस्थित होता. तो एका शाखेचा शाखाप्रमुख आहे, तर दिपाली भिलारे या शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख आहेत. त्यामुळे हा खून राजकीय हेतूने करण्यात आला की अन्य कारणाने याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.