कुकडीच्या पाण्यासाठी उपोषण करण्यावर राम शिंदे ठाम

अहमदनगर : पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठकीमध्ये सहा जूनपासून नगरसाठी कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कुकडीच्या पाण्यासाठी एक जूनपासून उपोषण करण्यावर माजी मंत्री प्रा.

अहमदनगर :   पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठकीमध्ये सहा जूनपासून नगरसाठी कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कुकडीच्या पाण्यासाठी एक जूनपासून उपोषण करण्यावर माजी मंत्री प्रा. राम शिंदे ठाम आहेत. पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरी त्याबाबतचे नियोजन मला कोणीही कळवले नाही. त्यामुळे कुकडीच्या पाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी कर्जत येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारी उपोषणाला बसणार आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

कुकडीच्या पाण्यावरून नगर जिल्ह्यात वातावरण तापलेले आहे. पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि त्यानंतर भाजपचे श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी एक जूनपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. त्यातच सहा जूनपासून कुकडीचे पाणी सोडण्याची घोषणा झाली आहे. त्यानंतरही आपण उपोषणावर ठाम असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. ‘पाणी सोडण्याचा निर्णय झाला असला तरी त्याबाबतचे नियोजन मला कोणीही कळविलेले नाही. तसेच, उपोषण मागे घेण्याबाबत विनंतीही केली नाही. आम्ही निवेदन दिल्यानंतर घाईघाईने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जात असेल तरी त्याचे नियोजन कशा पद्धतीने केले जाणार, ते तांत्रिक दृष्ट्या कसे शक्य आहे, अशा माझ्या शंका आहेत. त्यामुळे मी उपोषणाला बसणार आहे,’ असेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, प्रा. शिंदे व आमदार रोहित पवार हे रविवारी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकत्र आले होते. या वेळी कुकडी पाण्याबाबत काही चर्चा झाली का, असे शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘भेट झाल्यावर त्यांनी कुकडीचे पाणी सहा तारखेला सोडले जाणार असल्याचे सांगितले. परंतु ते कशा पद्धतीने सुटणार आहे, नियोजन कसे, असे मी त्यांना विचारले असता त्यांना माझ्या शंकाचे निरसन करता आले नाही.’