रांजणगाव गणपती येथील  मोबाईल हिसकावून पळणारा जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे विभागाच्या पथकाची कारवाई

शिक्रापूर : रांजणगाव गणपती ता. शिरूर येथे एका दुकानासमोर मोबाईलवर बोलणाऱ्या इसमाचा मोबाईल घेऊन दुचाकीवरून पळून गेलेल्या एका युवकाला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले असून अटक करण्यात आलेल्या युवकाला चोरीच्या मोबाईल सह रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रांजणगाव गणपती ता. शिरूर येथे नऊ सप्टेंबर रोजी अरुण गवळी हे रात्रीच्या सुमारास महाराजा कुशन दुकानासमोर फोनवर बोलत होते यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून तिघे युवक आले त्यांनी गवळी यांचा मोबाईल हिसकावून पळून गेले, याबाबत अरुण बाळासाहेब गवळी रा. जुना टोलनाका रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना सदर गुन्ह्यातील आरोपी टाकळी हाजी परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, दयानंद लिम्हण, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, पोलीस नाईक जनार्दन शेळके यांनी टाकळी हाजी परिसरात सापळा रचून दत्तात्रय विश्वनाथ भाकरे वय २० वर्षे रा. उचाळे वस्ती टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले, यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चोरीला गेलेला मोबाईल जप्त केला तर त्याचे दोन साथीदार बाबू बबन वाळुंज रा. टाकळी हाजी उचाळे वस्ती ता. शिरूर जि. पुणे व सोन्या गावडे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे हे फरार झाले आहे तर अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय भाकरे याला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे करत आहे.