‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

    पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलात जाऊन येथील मॅनेजर यांना धमकावत पैसे घेतल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्तांनी त्याचे निलंबन केले आहे.

    पोलीस उपनिरीक्षक मिलन मुरकुटे (वय 28) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मारुती गोरे (वय 31 रा. केदारेश्वर कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलन कुरकुटे पिंपरी चिंचवड पोलिसांत उपनिरीक्षक म्हणून आहेत. पोलीस गणवेशात फिर्यादी मॅनेजर म्हणून असलेल्या हॉटेलात आले. मी कमिशनर ऑफिसमधून आल्याचे सांगत गोंधळ घालून आरडाओरडा केला. हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 2 हजार रुपयांची खंडणी उकळली. यानंतर येथील हॉटेल वन लॉज येथे गेले. मॅनेजर साहील पित्रे यांना धमकावून 2 हजार रुपये घेतले. त्यानंतर हॉटेल कार्निव्हलमध्ये गेले. तेथील मॅनेजर किशोर छोटुमल थापा यांना धमकी देत 3 हजार रुपये खंडणीस्वरुपात घेतले, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    निलंबनाची कारवाई

    पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे यांचा प्रताप समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील लाच घेताना पकडल्यानंतर निलंबित केले होते. याप्रकारणात नुकतेच कुरकुटे पुन्हा सेवेत घेतले होते. सध्या ते पिंपरी चिंचवड आयुक्तालयात नियंत्रण कक्षात सलग्न होते. मध्यंतरी ते आजारपणाच्या रजेवर गेले होते.रजेवर असताना कुरकुटे यांनी हा प्रकार केला आहे.