धक्कादायक ! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

    पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फिरण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला असून, शिक्रापूर पोलिसांनी महेश दत्तात्रय गोरडे या युवकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

    पीडित मुलीसोबत गावातील महेश गोरडे या युवकाने ओळख करून घेतली. त्याने मुलीला त्याच्या जवळील कारमध्ये फिरायला घेऊन जाण्याचा बहाणा करत खेड तालुक्यातील एका हॉटेलवर घेऊन गेला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेनंतर त्याने कोणाला काही न बोलण्याची धमकी देत पीडितेला घरी आणून सोडले. त्यांनतर जेव्हा संबंधित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर घरातील व शेजारील महिलांना तिच्याबाबत काही संशय आल्याने त्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. नंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता ती गरोदर असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला.

    आरोपीस ५ दिवसांची पोलिस कोठडी

    मुलगी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितेच्या आईने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी महेश दत्तात्रय गोरडे (वय २५ वर्षे रा. पिंपळवंडी पाबळ ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचार, बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली. तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. दरम्यान, आरोपी महेश गोरडे याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.