‘तो’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

सुरुवातीला पीडित मुलगी आणि तिच्या आईने फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी त्यांना विश्‍वासात घेऊन घटनेचे गांभीर्य समजावून सांगितल्यानंतर शुक्रवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच घरच्यांना मारून टाकण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केले. ही घटना पिंपरी चिंचवडमधील चिंचवड येथे घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने शुक्रवारी (दि. 27) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जून 2020 ते 24 ऑगस्ट 2021 या कालावधीत चिंचवड येथे घडली. आरोपी पीडित 14 वर्षीय मुलीला तुझ्या घरच्यांना मारून टाकेल. तसेच तुझा अश्‍लील व्हिडिओ व्हायरल करेल, अशी धमकी देऊन आरोपी रहात असलेल्या घराजवळ तसेच एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यापैकी एका अल्पवयीन मुलावर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर दुसऱ्या अल्पवयीन मुलावर एक गुन्हा दाखल आहे.

    याबाबत सुरुवातीला पीडित मुलगी आणि तिच्या आईने फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र, पोलिसांनी त्यांना विश्‍वासात घेऊन घटनेचे गांभीर्य समजावून सांगितल्यानंतर शुक्रवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.