प्रसुतीपूर्व गर्भवतींची होणार रॅपिड अँटीजेन टेस्ट

मंचर उपजिल्हा रुग्णालयाचा निर्णय

मंचर :  मंचर उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची प्रसूतीपूर्वी १० दिवस अगोदर रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून  निर्णय रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. चंदाराणी पाटील यांनी दिली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या अध्यक्षतेखाली  रुग्णकल्याण समितीची बैठक झाली. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, डॉ वर्षाराणी गाडे, डी.के.वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता विजय अघाव,गणेश औटी, आमीन पठाण उपस्थित होते.

तातडीच्या गरीब व गरजू गरोदर माता व इतर रुग्णांकरिता एकस-रे ,सोनोग्राफी,रक्तपिशव्या इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी खासगी प्रयोगशाळाबरोबर सवलतीच्या दरात करार करणे. हंगामी स्वरुपात स्वच्छता कर्मचारी नेमणे, कोरोना विषयी जनजागृती करण्याचा व लोक सहभागातून गरम पाण्यासाठी गिझर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कालबाह्य झालेल्या पाईपलाईन बदलण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्यावर सोपविण्यात आली.

-वैशाली राजेंद्र शिंदे यांचा सत्कार  

कोविड संशयितांचे तातडीने अहवाल उपलब्ध व्हावा. म्हणून राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानुसार गुरुवार (ता.३०जुलै) पासून  रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु करण्यात आली. त्यासाठी आवश्यक असलेले कीट उपलब्ध आहेत. तपासणीनंतर ताबडतोब अहवाल प्राप्त होत असल्याने कोरोनाबाधितांचे विलगीकरण करुन गरजेनुसार अवसरी खुर्दच्या शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात,उपजिल्हा रुग्णालय,भीमाशंकर हॉस्पिटल कोविड केंद्रात उपचार करणे सोयीचे झाले आहे.अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ.चंदाराणी पाटील व डॉ. संजय भवारी यांनी दिली. यावेळी औंध-पुणे हॉस्पिटल कोविड उपचार केंद्रात चार महिने काम करुन परत मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार केंद्रात कार्यरत झाल्याबद्दल अधीपरिचारिका वैशाली राजेंद्र शिंदे यांचा सत्कार  करण्यात आला. शिंदे यांनी कोरोना पॉझिटिव रुग्णांबरोबर आलेले अनुभव कथन केले.