१८ व्या शतकातील दुर्मिळ पुस्तके इंटरनेवर!

राजगुरूनगर वाचनालयाकडून डिजिटायझेशन
राजगुरूनगर: येथील सार्वजनिक वाचनालयातील दुर्मिळ पुस्तके वाचकांसाठी इंटरनेटवर जतन करून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वाचनालयाचे मानद सचिव राजेंद्र सुतार यांनी दिली.

राजगुरूनगर येथे १८६२ मध्ये काही पोथ्या व पुस्तकांच्या भांडवलावर येथील समाज ‘धुरंधरांनी जनरल नेटीव्ह लायब्ररी, खेड’ नावाने स्थापन केली. वाचनालयाने प्रगती साधत पुस्तके व सभासद वाढवत नेले. सर्व पुस्तकांचे जतनही केले. यापैकी २४ पुस्तके व एक हस्तलिखिताचे एकूण ६३०० पाने तेही १९०० पूर्वीची यांचे डिजिटायझेशन करून हा अमूल्य वैभवशाली ठेवा नव्या दिमाखात इंटरनेटवर उपलब्ध करून दिला आहे.

सुतार म्हणाले की, १८३२ ते १९०० पर्यंतचा हा ठेवा आहे. शासनाच्या दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करून हा ठेवा जतन करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्था मुंबई संस्थेने फेब्रुवारी २०१८ मध्ये ठाणे येथे महाराष्ट्रातील शतायु वाचनालयाची दुर्मिळ पुस्तकांचे डिजिटायझेशन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यास महाराष्ट्रातील ८७ शतायु वाचनालयांपैकी राजगुरूनगरच्या सार्वजनिक वाचनालयाने प्रतिसाद दिला.

पथदर्शी प्रकल्पाचे प्रथम मानकरी होण्याचा मान मिळाला आहे. हे सर्व साहित्य विकिपीडिया कॉमन्स या प्रकल्पात ‘बुक इन मराठी’ या मुख्य वर्गातील बुक्‍स विथ पब्लिक लॅबररी राजगुरूनगर, पब्लिश बिफोर १९९० या उपवर्गात उपलब्ध झाले आहे. हा ठेवा मोफत, लिंक पाठवून, डाऊनलोड करून प्रसार करता येईल. हा प्रकल्प पूर्ण केला असून ही प्रक्रिया निरंतर सुरुच राहणार आहे. विज्ञान आश्रम पाबळ येथील संस्थेचे संचालक योगेश कुलकर्णी यांनी स्कॅनिंग, विकी प्रकल्पात अपलोड, ओसीआर प्रक्रिया करुन युनीकोडमध्ये रुपांतर करण्याचे काम ग्रामीण भागातील युवतींनी पूर्ण केले आहे. प्रथम स्कॅनिंग ते ओसीआर प्रक्रिया पूर्ण करून ती सहज शोधनपद्धती सोपी केली आहे. ही दुर्मिळ ग्रंथसंपदा विकिपीडियावर सार्वजनिक वाचनालय राजगुरूनगर असा शोध घेतल्यास उपलब्ध होणार आहेत.

विस्मृतीत गेलेले व शोधण्यास अवघड असे हे मौलीक संदर्भ साहीत्य मुक्तस्त्रोतात उपलब्ध झाल्याने चिरंतन झाले आहे. त्यातील प्रत्येक शब्द आता सर्चेबल झाल्याने ग्रंथातील अनेक लपलेल्या किंवा दुर्लक्षित जागांच्या संदर्भात संशोधन, अभ्यास होण्याची शक्‍यता अनेक पटींनी वाढते.

-सुबोध कुलकर्णी, कर्यक्रम अधिकारी, सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी