स्थायी समिती सभापती पदासाठी रवी लांडगे, नितिन लांडगे आणि शत्रुघ्न काटे यांच्यात चुरस

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला केवळ दहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. शेवटच्यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला द्यायचे यावरुन भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने नगरसेवकांची नाराजी उफाळून येवू नये, यासाठी स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्यांना संधी देण्यासाठी भाजपमध्ये एक वर्षाच्या धोरणाबाबत गंभीरपणे चर्चा सुरु आहे.

    पिंपरी: शेवटच्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिका तिजोरीची चावी हाती ठेवण्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. सदस्यांच्या नियुक्ति नंतर आता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भोसरीतील रवी लांडगे, नितिन लांडगे आणि चिंचवड मतदारसंघातील शत्रुघ्न काटे यांच्यात तीव्र चूरस आहे. बिनविरोध निवडून आलेल्या रवी लांडगे यांच्यासाठी निष्ठावान गटाच्या जोर-बैठका सुरु आहेत. लांडगे, काटे या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की ऐनवेळी भाजप दुस-या कोणाला संधी देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला केवळ दहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. शेवटच्यावर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला द्यायचे यावरुन भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेतून भाजपात आलेल्या भोसरी मतदारसंघातील सीमा सावळे यांना पहिल्यावर्षी, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले वाकडमधील माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी ममता गायकवाड यांना दुस-या वर्षी, पक्षातील जुने कार्यकर्ते भोसरीतील विलास मडिगेरी तिस-या वर्षी आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले संतोष लोंढे यांना चौथ्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले.

    सावळे, मडिगेरी भोसरीतील असले तरी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक मानले जातात. आता महापौर, सभागृहनेतेपद चिंचवड मतदारसंघात तर उपमहापौरपद पिंपरीत आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीची चाव्या हाती असलेले स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणत्या मतदारसंघात जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात एकही पद मिळाले नसल्याने रवी लांडगे यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत नाराज असल्याचा संदेश पक्षनेतृत्वाला दिला. त्यानंतर रवी लांडगे यांची स्थायीत वर्णी लागली. आता समितीच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांना भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचा वारसा आहे.

    ‘भाजयुमो’चे शहराध्यक्षपदही रवी लांडगे यांनी भूषविले आहे. ते बिनविरोध निवडून आले असून पक्षाचे निष्ठावान आहेत. लांडगे यांच्यासाठी जुना गट देखील आग्रही आहे. त्यासाठी बैठकाही सुरु आहेत. रवी लांडगे विधानसभेसाठीही इच्छुक होते. भविष्यात ते डोईजोड होवू नयेत यासाठी शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा त्यांना विरोध होवू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्याच प्रमाणे भोसरी विधानसभा मधुन आमदार आणि भाजपा चे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक नितिन लांडगे हे ही तीव्र इच्छुक आहेत.

    आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक मानले जात असलेले शत्रुघ्न काटे हे देखील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. ते राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. मागील चार वर्षात महापौर, सत्तारुढ पक्षनेते पदासाठी इच्छुक असताना त्यांना ते मिळाले नाही. शेवटच्यावर्षी त्यांची ‘स्थायी’त वर्णी लागली असून ते अध्यक्षपदासाठी दावेदार मानले जातात. त्यामुळे अध्यक्षपदासाठी लांडगे आणि काटे यांच्यात तीव्र चूरस आहे. दोघांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की ऐनवेळी तिस-यालाच संधी दिली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    स्थायी समितीतील पक्षीय बलाबल !

    महापालिकेच्या स्थायी समितीत १६सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे १० राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे (१ मार्चपासून), शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव (१ मार्चपासून) असे १६ सदस्य स्थायी समिती आहेत.

    निवडणूक होताच भाजप ६ सदस्यांचे राजीनामे घेणार

    आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने नगरसेवकांची नाराजी उफाळून येवू नये, यासाठी स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्यांना संधी देण्यासाठी भाजपमध्ये एक वर्षाच्या धोरणाबाबत गंभीरपणे चर्चा सुरु आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झालेल्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे आणि भीमाबाई फुगे यांचे राजीनामे घेतले जावू शकतात, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.