रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ; खंडणी,फसवणूक असे तब्बल १२ गुन्हे दाखल

बऱ्हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु होते. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.

    पुणे : जमीन लाटणे, जमिनींच्या कागदपत्रात फेरफार, खंडणी, फसवणूक असे तब्बल १२ गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे स्वत:च पोलिसांना शरण बुधवारी ( दि. ७) त्याला मे.नाविंदर कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्याने केलेल्या गुन्हयांचा तपास करण्याबरोबरच त्याला सहकार्य केलेल्या आरोपींकडून इतर माहिती हस्तगत करण्यासाठी सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत बऱ्हाटे याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

    बऱ्हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु होते. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता.या काळात तो विविध राज्यात लपून छपून रहात असल्याचे पुढे आले आहे. पुण्यातून तो पळून जाताना मावळ तालुक्यातील एकाची दुचाकी घेऊन पसार झाला होता. त्यानंतर पुणे परिसरात काही काळ लपून बसला होता. त्यानंतर तो सोलापूर, सातारा या भागात काही ओळखीच्या लोकांकडे राहिला. त्यानंतर तो गुजरात, हैद्राबाद, कर्नाटक या राज्यात गपचूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आज पोलीस आयुक्तालयात आल्यानंतर तो तणावाखाली दिसून आला. त्याला चालतानाही त्रास होत असल्याचे जाणवत होते. नुकतीच त्यांची पत्नी संगीता, मुलगा मयुर यांच्याबरोबर पिंताबर धिवार, अ‍ॅड. सुनिल मोरे यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात चारी बाजूने फास आवळत आणला होता. त्यामुळे सर्व मार्ग बंद होत असल्याचे दिसल्यावर आज रवींद्र ब-हाटे याने पोलिसांशी संपर्क साधून आपण पोलीस आयुक्तालयात येत असल्याचे कळविले. त्यानुसार मंगळवारी (दि.६ ) दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात आणण्यात आले. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.