स्वातंत्र्यानंतर ‘इथं’ पहिल्यांदाच घरात पेटला बल्ब

    राजगुरूनगर : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच घरात पेटलेला बल्ब पाहून खेड तालुक्यातील कडूस गावामधील रुकेदरा व मुसळेवाडी येथील ठाकरवस्तीत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. यासाठी प्रकाशदूत ठरलेत पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य रविंद्र गायकवाड !

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्गम भागाला वीज पुरवठा करुन एक आगळा वेगळा उपक्रम आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. आदिवासी दाम्पत्याच्या हस्ते केक कापण्यात आला आणि वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर घरासमोर गुढी उभारून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. आमदार मोहिते यांच्या वतीने सर्व नागरिकांना लाडूवाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

    यावेळी माजी सभापती अरुण चांभारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शेंडे, सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, उद्योजक प्रताप ढमाले, बाळासाहेब धायबर, पंडित मोढवे, मारुती जाधव, बाळासाहेब बोंबले, हेमलता खळदकर, सुधा पानमंद, लता ढमाले, विजया नाईक, शहनाज तुरूक, बारकू गायकवाड, गणेश मंडलिक, अनिकेत धायबर, रंजना पानमंद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

    ‘वस्तीवर लाईट आल्याने येथील शालेय विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. याचे आत्मिक समाधान काही वेगळेच आहे. मला याकामी पुणे ग्रामीण अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार व कार्यकारी अभियंता संतोष गरुड यांचे विशेष सहकार्य लाभले. उपसरपंच कैलास मुसळे यांच्या पाठपुराव्याने रुकेदार या आदिवासी वस्तीवर वीज पोहचली.’

    – रविंद्र गायकवाड, सदस्य, पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती.