नारायणगावात रेडिमेड कपड्याच्या गोदामाला आग; २५ लाखांचा ऐवज आगीत खाक

    नारायणगाव : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील अडसरे बंधू यांच्या मालकीच्या प्रीतम बिल्डिंगमधील पहिल्या माळ्यावरील दोन गाळ्यांना आज (दि.१६) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये येथील चोरडिया बंधू यांचे  रेडिमेड कपड्यांचे गोडाऊन होते. यामध्ये सुमारे पंचवीस लाख रुपयांचा रेडीमेड कपड्यांचा माल जळून खाक झाला असल्याचा अंदाज गोडाऊनचे मालक चोरडिया यांनी व्यक्त केला.
    दरम्यान, घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे तसेच पोलीस कर्मचारी, नारायणगाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी अग्निशमन दलाच्या जुन्नर येथील कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. ही आग सातत्याने होणाऱ्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे लागली असावी, असा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी व या बिल्डिंगचे मालक अडसरे बंधू यांनी व्यक्त केला आहे.