महाराष्ट्रात ई-पासची ‘तत्वतः’ गरज, मात्र ‘प्रत्यक्षात’ गरज नाही, जाणून घ्या काय आहे प्रकार

आंतरजिल्हा प्रवासासंदर्भात सरकारने स्पष्ट केले आहे की, पहिल्या चार टप्प्यांमध्ये प्रवास करत असाल तर नियमितपणे वाहतूक सुरू आहे. केवळ पाचव्या टप्प्यातून तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यासाठी ई-पास आवश्यक आहे. सध्यातरी पाचव्या टप्प्यात एकही जिल्ह्याचा समावेश नाही.

    मुंबई:- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान मांडले होते. त्यासाठी राज्यसरकारने काही निर्बंध लादले होते. कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. त्यामुळे सरकारने निर्बंध जरी कमी केले असले तरी आपण आपली काळजी घेणं गरजेचे आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं सरकारनं आजपासून नवी नियमावली लागू केली आहे. या अंतर्गत राज्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

    आजपासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. अनलॉकला जरी सुरुवात झाली असली तरी स्थानिक प्राधिकरणाला निर्बंध हटवावे की ठेवावे हे ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ठरविल्या आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत.