…म्हणून वाचला धीरज घाटेंचा जीव; राजकारणातून हत्या करायची नव्हती..!

गेल्या पंधरा दिवसांपासून विकी आणि आरोपी धीरज घाटे यांच्यावर पाळत ठेवून होते. एकटे दिसताच त्यांना ठार मारले जाणार होते. त्यासाठी त्यांनी तीक्ष्ण अशा तीन पालघन तयार करून घेतल्या होत्या.

  पुणे : भाजपचे नगरसेवक धीरज घाटेंच्या (Dheeraj Ghate) हत्येचा कट उधळला गेला आहे. केवळ अन् केवळ धीरज घाटेंसोबत सतत कोणीतरी असल्याने त्यांना ठार मारता आले नसल्याची धक्कादायक माहिती पोलीसांच्या तापासातून समोर आली आहे. तर, आमच्या जीवावरच मोठे झाले अन् आता आम्हालाच विचारत नसल्याच्या रागातून त्यांना संपविण्याचा डाव रचण्यात आला असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे केवळ आगामी निवडणुकीतून हा कट रचला नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. या घटनेने मात्र शहरातील राजकारण ढवळून निघाले आहे.

  वितुल ऊर्फ विकी वामन क्षीरसागर (वय ३३, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा कॉलनी), मनोज संभाजी पाटोळे (वय ३०, रा. साने गुरुजीनगर) आणि महेश इंद्रजित आगलावे (वय २५, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे (वय ४६) यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. कट रचणे (१२० ब) व गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे (११५) कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. या तिघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी हा पूर्वी घाटे यांच्याबरोबर काम करत होता. पण, गेल्या काही ‌वर्षांपासून तो त्यांच्यापासून दुरवला गेला. यादरम्यान, घाटे यांच्या कार्यकर्त्यांची व आरोपींची काही वेळा वाद झाले होते. विकीला आपल्या अंगावर मुद्दामून कार्यकर्ते लावतात, असा समज त्याचा झाला. तर, आमच्यामुळे मोठे झाले अन् आम्हालाच विचारत नाही, याचा राग विकीच्या याच्या मनात होता. त्यातूनच या हत्येचा कट रचण्यात आला होता.

  पंधरा दिवसांपासून हत्येचा कट…तीन पालघन तयार करून घेतल्या

  गेल्या पंधरा दिवसांपासून विकी आणि आरोपी धीरज घाटे यांच्यावर पाळत ठेवून होते. एकटे दिसताच त्यांना ठार मारले जाणार होते. त्यासाठी त्यांनी तीक्ष्ण अशा तीन पालघन तयार करून घेतल्या होत्या. त्यानुसार हे तिघे त्यांना ठार मारणार होते. मात्र, धीरज घाटे एकटे कधीच नसायचे. त्यांच्यासोबत कोणीना कोणी असत. तर, ते गाडीत असत. त्यामुळे त्यांना मारता आले नाही.

  घाबरले अन् कट उधळला गेला…

  शेफ्रॅन हॉटेलला घाटे व त्यांचा एक कार्यकर्ता चहा पिण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपी काळ्या रंगाची बॅग घेऊन तेथे आले होते. घाटे एसीरूममध्ये बसले होते. तर, आरोपी हे बाहेर होते. पण, घाटे यांच्यासोबत एकजण होता. तर, आरोपीही नवखे होते. ते घाबरत होते. तर, घाटे यांनी काही तरी कामासाठी आणखी एकाला बोलावून घेतले. त्यामुळे आरोपींचे धाडस झाले नाही. त्यातच हॉटेलच्या वेटरनेही या तिघांना हटकले होते. त्यामुळे ते भीतीनेच बाहेर उठून आले व निघून गेल्याचे, तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेकडे घाटे यांनी तक्रार दिली. उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे पोलीस निरीक्षक अभय महाजन व त्यांच्या पथकाने लागलीच या तिघांना पकडले.

  पोलिसांकडे दिलेली तक्रार…

  ३ सप्टेंबरला धीरज घाटे व त्यांचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे कार्यालयातून शास्त्री रोडवरील शेफ्रॅन हॉटेलात चहा पिण्यास गेले. एसी रुममध्ये बसले असताना आणखीन तिघेजण तेथे आले. त्यांच्यापैकी एकाकडे काळी बॅग होती. त्यांचे लक्ष घाटे यांच्याकडे होते. ते त्यांना अधून-मधून पहात होते. घाटे यांना संशय आला. त्यामुळे त्यांचा कार्यकर्ता अमर आवळे याने बाहेर जाऊन पाहिले. तेव्हा त्यांना हॉटेलच्या बाहेर विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे हे थांबल्याचे दिसले. त्यांनी हा प्रकार घाटे यांना सांगितला. त्यामुळे त्यांनी या हॉटेलमधून बाहेर पडत दुसरीकडे चहा घेण्यास गेले. त्याचवेळी त्यांना या तिघांपैकी एक जण विकी क्षीरसागर व मनोज पाटोळे यांच्याबरोबर काही तरी बोलत, असल्याचे समजले. त्यांनी परत येऊन शेफ्रन हॉटेल येथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी त्यांना संशय आला व त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली.