जुन्नर तालुक्यात राेखला बालविवाह ; बाल संरक्षण अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे प्रशासनाला यश

बोरी शिरोली (ता. जुन्नर) येथील एका कुटुंबातील मुलगी १७ वर्षांची असतानाच तिचा विवाह केळवाडी घारगाव (ता. संगमनेर) येथील मुलाशी ठरविण्यात आला होता. हा विवाह बांगरवाडी येथील एका मंगल कार्यालयात २८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार होता.

  बेल्हे : बांगरवाडी (ता. जुन्नर) येथे कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत होणारा बालविवाह रोखण्यात पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्या तत्परतेमुळे प्रशासनाला यश आले. जुन्नरसारख्या प्रगत तालुक्यात बालविवाह होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पुन्हा बालविवाह प्रतिबंधक कायदे आणि बालविवाहाचे दुष्परिणाम हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

  निनावी संदेशाद्वारे मिळाली माहिती 
  ग्रामीण भागांमध्ये बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्याने बालविवाह न करण्याचा पालकांनी प्रयत्न करायला हवा, अशी प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे. पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांना जुन्नर तालुक्यातील बांगरवाडी येथे बालविवाह होणार असल्याचा एक निनावी संदेश प्राप्त झाला होता. त्यांनी तत्परतेने बांगरवाडी येथील ग्रामविकास अधिकारी व आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांना होणाऱ्या घटनेची माहिती दिली.

  मुलगी १७ वर्षांची असताना ठरला विवाह

  बोरी शिरोली (ता. जुन्नर) येथील एका कुटुंबातील मुलगी १७ वर्षांची असतानाच तिचा विवाह केळवाडी घारगाव (ता. संगमनेर) येथील मुलाशी ठरविण्यात आला होता. हा विवाह बांगरवाडी येथील एका मंगल कार्यालयात २८ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार होता. त्यापूर्वी तत्परतेने बांगरवाडीचे ग्रामविकास अधिकारी अजित कुंभार, सरपंच जालिंदर बांगर, निलेश बांगर, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांच्या आदेशानुसार जमादार अंकलेश्वर भोसले, विकास गोसावी, महेश काठमोरे, पद्मसिंह शिंदे व गोरक्ष हसे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे होणारा बालविवाह वेळीच रोखण्यात आला.

  मंगल कार्यालयाला ५ हजारांचा दंड

  बांगरवाडी गावचे ग्रामसेवक अजित कुंभार यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने मंगल कार्यालयाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला तर आळेफाटा पोलिसांनी मुलीच्या वडिलांकडून मुलींचे अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, सर्वतोपरी सांभाळ करु, मुलीला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास देणार नाही व लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही अन्यथा मी कारवाईला सामोरे जाईल, असे लिहून घेण्यात आले आहे.

  पुणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांचे पत्र आल्याने आम्ही तात्काळ मंगल कार्यालयात जाऊन विवाह रोखला. मंगल कार्यालयास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, भविष्यात असा प्रकार होणार नाही अशी समजही दिली.

  -अजित कुंभार, ग्रामविकास अधिकारी, बांगरवाडी

  “बाल विवाह करणे कायद्याविरुद्ध आहे. त्यामुळे मुलीच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सदर मुलीच्या वडिलांना समज देण्यात आली असून, बालविवाह झाल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

  -मधुकर पवार, पोलिस निरीक्षक, आळेफाटा