कोरोनाबाधित महिलेच्या नातेवाईकांचा खासगी प्रयोगशाळेत तपासणीचा आग्रह

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका मळ्यात सत्तर वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी (ता. ११) दुपारी आढळून आले आहे. मात्र, संबंधित महिलेचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका मळ्यात सत्तर वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे शुक्रवारी (ता. ११) दुपारी आढळून आले आहे. मात्र, संबंधित महिलेचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेने दिला असतानाही नातेवाईकांनी तो नाकारला असून, स्वॅबची तपासणी हडसपर येथील खासगी प्रयोगशाळेत करण्याचा आग्रह धरला आहे.   
 
लोणी काळभोर येथील सत्तर वर्षीय महिलेच्या पोटात वेदना होत होत्या. त्यामुळे संबधित महिला गुरुवारी (ता. ११) उपचारासाठी लोणी काळभोर हद्दीतील एका खासगी रुग्णालयात गेली होती. संबधित महिलेवर उपचार करण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेलेचा स्वॅब (घशातील द्राव) लोणी काळभोर येथील कोविड केअर सेंटरमधून पुढील तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल शुक्रवारी सकाळी आला. त्यात महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी दिली. 
 लोणी काळभोर येथील वरील सत्तर वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेने दिला असतानाही संबधित महिलेच्या नातेवाईकांनी मात्र वरील महिला कोरोनाबाधित नसल्याचा दावा केला आहे. संबधित महिलेचा स्वॅबची तपासणी हडसपर येथील खासगी प्रयोगशाळेत करण्याचा आग्रह धरला आहे. तसेच, कोरोना पॉझिटीव्ह असतानाही संबधित महिलेस उपचारासाठी कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यास नकार नातेवाईकांनी दिला आहे. तसेच, संबधित महिलेचे नातेवाईक महिलेला उपचाराऐवजी घरीही घेऊन गेले.
 
-स्वॅबची करणार पुन्हा तपासणी
महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल नाकारण्यावर नातेवाईक ठाम असल्याचे पाहून प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डि. जे. जाधव यांनी महिलेचा स्वॅब तपासणसाठी हडपसर येथील खासगी प्रयोगशाळेत पाठवून दिला आहे. तेथील अहवाल येताच या महिलेवर कोरोनाचे उपचार करायचे की नाही, याचा निर्णय केला जाणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेची प्रयोगशाळा विषाणू विषयक रोगांचे निदान करण्याबाबत अधिकृत मानली जाते. मात्र लोणी काळभोर येथील महिलेच्या नातेवाईकांनी मात्र वरील संस्थेचाही अहवाल नाकारला आहे. संबधित महिलेच्या नातेवाईकांनी स्वॅबच्या तपासणीसाठी खाजगी प्रयोगशाळेला प्राधान्य दिले आहे. राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या प्रयोगशाळेतील विषाणू रोगविषयक अहवाल नाकारण्याची देशातील पहिलीच घटना असावी, अशी शंका जिल्हा परीषदेच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.