३१ तारखेनंतर पुण्यातील लॉकडाऊन शिथिल करा ; व्यापारी महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिले पत्र

    पुणे : अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर व्यापाऱ्यांसमाेर आर्थिक संकट उभे राहीले आहे. यामुळे ३१ मेनंतर लाॅकडाऊन वाढवू नका, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे.

    यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी निवेदन दिले आहे. राज्यात ५एप्रिल पासून सुरु झालेल्या लॉकडाउन च्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार वगळूण अन्य सर्व व्यापार बंद राहिला आहे. यामुळे राज्याबराेबरच पुण्यातील व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत.

    गुढी पाडवा ,अक्षय तृतिया,ईद या महत्वाच्या सणाच्या कालावधीत हाेणारी उलाढाल ठप्प राहीली. याकालावधीत सुमारे ७५ हजार काेटी रुपयांची उलाढाल मंदाविली असल्याचा दावा महासंघाने केला आहे.

    व्यापारी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्याच्या महसुलामध्ये त्याचे मोठे योगदान आहे.हे क्षेत्र तब्बल २ महिन्याच्या लॉकडाउनमुळे अडचणीत आले आहे. व्यापाऱ्यांनी काहीही उत्पन्न नसताना गेले दाेन महिने कर्मचाऱ्यांचे पगारहि दिले .परंतु यापुढे कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार देणे अशक्य झाले आहे. तसेच काम आणि उत्पन्नच नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. पर्यायाने बेरोजगारी वाढत आहे. व्यापारी ,कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत सापडले असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार सुरु करण्याची परवानगी दयावी अश मागणी महासंघाने केली आहे. तसेच बाजारपेठांवर बंदचे निर्बंध आणि ई -कॉमर्स कंपन्या परवानगी नसताना राजरोसपणे जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त वस्तूंचा व्यवसाय करीत आहेत.त्यामुळे व्यापाऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची पाळी आली आहे.

    व्यापार क्षेत्र टिकवण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांना तीन महिन्याचे वीज बिल व बँक कर्जावरील व्याज माफ करावे तसेच स्थानिक मालमत्ता कर माफ करावे, भरीव आर्थिक पॅकेज जाहीर करावे, ३१ मे नंतर लॉकडाउन अधिक न वाढवु नये, नियमांना अधीन राहून व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशा मागण्या महासंघाने केल्या आहेत.