बारामतीतील व्यापाऱ्यांना दिलासा; सर्व दुकाने राहणार खुली पण…

    बारामती : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बारामती शहर व तालुका बंद होता. मात्र, आता व्यापारी वर्गासह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवार (दि. ८) पासून बारामती शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. तर किराणा व भाजीपाला विक्रीची दुकाने सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत ‌सुरु राहणार आहेत. १५ जूनपर्यंत ही वेळ कायम राहणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

    बारामतीत या २४ तासात केवळ ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. बारामती शहरात गेल्या तीन महिन्यांपासून असणारा कोरोनाचा आलेख घसरण्यास सुरूवात झाली आहे. एप्रिलमध्ये जवळपास दररोज ४०० च्या घरात शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. त्यामुळे ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात ५ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता.

    दरम्यान, बारामती शहरातील व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच बारामतीतील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने मंगळवारपासुन काही वेळ दुकाने उघडण्यास परवानगी मिळाल्याचे सुत्रांनी सांगितले.

    सर्व दुकाने राहणार खुली

    सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली राहणार आहेत. तर अत्यावश्यक वर्गातील दुकानांची वेळ आता वाढविण्यात आली आहे. किराणा, भाजीपाला, दूध यांसारख्या अत्यावश्यक सेवेअंतर्गत असणाऱ्या दुकानांची वेळ यापूर्वी ११ वाजेपर्यंत होती. आता ही वेळ मंगळवारपासुन ४ वाजेपर्यंत असणार आहे.