पी-१, पी-२ चे निर्बंध उठवा अन्यथा…; श्रीचंद आसवाणी यांचा इशारा

    पिंपरी : कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांवर पी-१, पी-२ प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास निर्बंध घातले आहे. हे निर्बंध तातडीने उठवा अन्यथा सोमवारपासून आंदोलन केले जाईल, असा इशारा पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी दिला.

    सोमवारपासून (दि.१४) मनप प्रशासनाने पी-१, पी-२ प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घातले आहे. परंतु, पिंपरी कॅम्प परिसरात बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाले मात्र राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होत आहे. ज्या बाजूची दुकाने बंद असतात त्या बाजूला पथारीवाले दुचाकीवर वस्तू विक्रीची दुकाने थाटतात. दुपारी चार वाजेपर्यंतच दुकान सुरु ठेवण्यास परवानगी असल्यामुळे महानगरपालिकेने नेमलेले कोविड मार्शल चारनंतर लगेचच व्यापाऱ्यांवर खटले भरायला सुरुवात करतात. मात्र, बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे पथारीवाले, फेरीवाल्यांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.

    मार्च २०२० पासून पिंपरी-चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिन्यापासून अंशत: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, मनपा प्रशासनाने व्यापा-यांचा विरोध डावलून फक्त पिंपरी कॅम्पमध्येच पी-१, पी-२ प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याचे बंधन घातले आहे.

    कामगारांचे पगार वसूल होणे अवघड

    या लॉकडाऊनमुळे सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवावी लागतात. शनिवारी व रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवावी लागतात. पी-१, पी-२ मुळे आठवड्यातून दोनच दिवस दुकाने सुरु ठेवावी लागतात. यातून कामगारांचे पगार देखील वसूल होणे अवघड आहे. व्यापाऱ्यांना वीजबील व मिळकत करात आणि जीएसटीमध्ये सवलत मिळावी, ही मागणी प्रलंबित असताना तसेच ग्राहकांची क्रयशक्ती कमी झालेली असताना व्यापा-यांवर बंधन घालणे अन्यायकारक आहे.

    …तर आंदोलन करू

    याबाबत फेडरेशनने वेळोवेळी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. याकडे देखील आयुक्तांनी दुर्लक्ष केले आहे. व्यापा-यांच्या मागणीवर आणि अडचणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा सोमवार (दि.२१) पासून आंदोलन करण्याचा इशारा आसवाणी यांनी दिला.

    व्यापारी मनपा प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करीत आहेत. ग्राहकांनीही नियमांचे पालन करावे. मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी व्यापा-यांचा या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेरडेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.