औद्योगिक परिसरातील सुविधांची वानवा दूर करा : निखील काळकुटे

औद्योगिक भागात रस्ते, स्ट्रीट लाइट, साफसफाई आदी किमान आवश्यक मूलभूत सुविधांपासून उद्योग परिसर वंचित आहेत. सारथी हेल्पलाइनवर तक्रार देऊनही प्रशासनाकडून ठोस उपायोजना करण्यात येत नसल्याने उद्योजक, कर्मचारी देखील नाराज आहेत.

  पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या विविध कंपन्यांच्या परिसरात मूलभूत सुविधांची वानवा दू करणेबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा. औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी भाजपा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष निखील काळकुटे यांनी केली आहे.
  याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्र आणि मुख्यत्वे भोसरी औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखाने आणि कंपन्याचे कामकाज चालते. लाखो कामगार या पट्ट्यात कामानिमित्ताने ये जा करतात. या कारखान्यांच्या माध्यमातून आजवर करोडो रुपयांचा महसूल महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. मात्र या महसुलाच्या तुलनेत या परिसराला मिळणाऱ्या मूलभूत सुविधा अगदी नगण्य आहे. औद्योगिक भागात रस्ते, स्ट्रीट लाइट, साफसफाई आदी किमान आवश्यक मूलभूत सुविधांपासून उद्योग परिसर वंचित आहेत. सारथी हेल्पलाइनवर तक्रार देऊनही प्रशासनाकडून ठोस उपायोजना करण्यात येत नसल्याने उद्योजक, कर्मचारी देखील नाराज आहेत.
  भोसरी औद्योगिक क्षेत्रात अनेक छोटया मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत.

  एमआयडीसी क्षेत्रात लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. कुशल व अकुशल कामगारांच्या रोजगाराची सोय झाली आहे. केमिकल, वाहनस्टील, मेटल, फर्निचर, घरबांधणी आदी साहित्याची निर्मिती एमआयडीसी करण्यात होती. परंतु, औद्योगिक परिसर अनेक समस्यांनी घेरला आहे. रस्त्यांची, दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. अनेक दुभाजकावर वाढलेली झुडपांमुळे परिसरास बकालपणा आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बारीक खडी रस्त्यावर असल्यामुळे वाहने घसरून अपघात घडत आहेत.
  येथील चौका चौकात रस्त्याच्या बाजूला प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, कापडी पिशव्या आदी टाकाऊ वस्तू टाकण्यात आल्या आहेत. नियमितपणे कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मोकळ्या जागेत कचरा टाकला आहे. त्यासोबतच कचरा प्रशासनाकडून उचला जात नसल्याने आग लावली जाण्याचे प्रकार सतत घडत आहेत. परिणामी वायुप्रदूषणा होऊन काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेक्टर क्रमांक सातमधील स्वच्छतागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे चाकरमानी, नागरिकांचे कुंचबणा होत आहे.

  औद्योगिक परिसरात अवजड वाहनांसाठी वाहनतळाची सोय नसल्यामुळे जड वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची सामना करावा लागत आहे. भोसरी औद्योगिक परिसरात सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगांची गैरसोय होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रशासनास अनेक वेळा सांगण्यात आले. त्यासोबतच सारथी हेल्पलाईनवर तक्रार करूनही अद्यापि काहीच कार्यवाही झालेली नाही. याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असेही निखील काळकुटे यांनी म्हटले आहे.