पुण्यासाठी नवी नियमावली जारी; हॉटेल्स रात्री ११ पर्यंत खुली तर…

हाॅटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली हाेती, ती मर्यादा आता अकरा वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येणार आहे.

  पुणे : शहरातील महाविद्यालये साेमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के करण्यास परवानगी दिली गेली आहे. २२ ऑक्टाेबरपासून नाट्यगृहे आणि सिनेमागृह उघडण्यासंदर्भातही विचार सुरू आहे.

  उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काेराेनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकार परीषदेत दिली. ‘‘शहरात राज्य सरकारची वेगवेगळी कार्यालये आहे. या कार्यालयात शंभर टक्के उपस्थिती केली गेली हाेती. परंतु खासगी आस्थापनांत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बंधने हाेती. आता शंभर टक्के उपस्थितीला परवानगी दिली गेली आ, असे पवार यांनी सांगितले.

  साेमवारपासून ( ११ ऑक्टाेबर) पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापािलका आणि जिल्ह्याच्या तेरा तालुक्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली गेली. सर्व विद्यार्थ्यांनी दाेन्ही लस घेतली असली पाहिजे. पुण्यात माेठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यातील विद्यार्थी येतात, त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. याची काळजी महाविद्यालयाच्या प्रशासन आणि संबंधित संस्थेने घेतली पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

  हाॅटेल रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली गेली हाेती, ती मर्यादा आता अकरा वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येणार आहे. तर २२ ऑक्टाेबरपासून ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याचा विचार आम्ही करीत आहाेत. पुढील आठवड्यात यासंदर्भात आढावा घेतला जाईल.

  राज्य सरकार आणि केंद्र सरकारची शहरातील सर्व ट्रेिनंग सेंटर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

  झाेपडपट्टीत लसीकरण वाढवा

  लसीकरणात देशात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. झाेपडपट्टी भागात लसीकरण वाढविण्यासाठी सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या भागातील नागरीकांमध्ये लसीकरणाविषयी जागरुकता निर्माण केली पाहीजे. घराेघरी जाऊन लसीकरणाचा प्रयत्न दाेन्ही महापािलकांमर्फत करण्याचा विचार केला जात आहे.