मीटर सक्तीच्या विरोधात उतरल्या शहरातील रिक्षा संघटना

चुकीच्या लोकांना सोबत घेऊन घेतलेला सक्ती निर्णय स्थगित करण्याची मागणी

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात मीटरने रिक्षा वाहतूक करण्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शहरातील विविध रिक्षा संघटना सक्तीच्या विरोधात उतरल्या. केवळ एका रिक्षा संघटनेला विश्वासात घेऊन पोलिसांनी चुकीच्या वेळी रिक्षा मीटर सक्ती लागू केली. शहरातील अन्य रिक्षा संघटनांसोबत चर्चा न करता, त्यांना विश्वासात न घेता ही सक्ती केली आहे. हा निर्णय योग्य असला तरी तो चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या लोकांना सोबत घेऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय स्थगित करावा अशी मागणी शहरातील रिक्षा संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत महामानव रिक्षा संघटना, रिक्षा पंचायत पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र श्रमिक ऑटो रिक्षा सेना, क्रांती रिक्षा सेना, हिंद रिक्षा संघटना यासह कष्टकरी संघर्ष महासंघ, नागरिक हक्क सुरक्षा समिती यांच्या वतीने गुरुवारी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांना हे निवेदन देण्यात आले आहे. या संघटनांचे पदाधिकारी मानव कांबळे, काशिनाथ नखाते, अशोक मिरगे, नितीन पवार, काशिनाथ शेलार, संजय गाढवे, गिरीष साबळे, नितीन राजू पवार, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात आजपासून मीटरने रिक्षा वाहतूक करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा निर्णय योग्य असला तरी तो चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या लोकांना सोबत घेऊन घेण्यात आला आहे. हा निर्णय स्थगित करावा. रिक्षा चालक अडचणीत असताना ही सक्ती लागू केल्याने रिक्षा संघटनांचा यासाठी विरोध आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसर हा विविध गावे मिळून तयार झाला आहे. यात औद्योगिक विकास मंडळाचा परिसर देखील समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे मीटर प्रमाणे रिक्षा प्रवासी भाडे तुरळक मिळतात. शहरातील नागरिकांना सीट नुसार प्रवास परवडतो. रिक्षा प्रवासी व्यवसाय कोरोना आधीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के राहिला आहे.

रिक्षा चालक मीटरनुसार जाण्यासाठी तयार असतानाही प्रवासी मिळत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे हा निर्णय सध्या लागू करणे योग्य नाही. या विषयी एकाच रिक्षा संघटनेशी चर्चा झाली आहे. वरील पाच रिक्षा संघटनांशी कोणतीही चर्चा केली नाही, असेही निवेदनात म्हटले आहे