‘सायकल चालवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा’ : जागतिक सायकल दिन भिगवण क्लबच्या वतीने साजरा

    भिगवण : युनायटेड नेशन्सच्या जनरल असेम्ब्लीने एप्रिल २०१८ मध्ये ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला. आजच्या काळात सायकल चालवणे किती महत्वाचे आहे, याबद्दल अनेकजण जनजागृती करताना पाहायला मिळतात. परंतु प्रत्यक्षात अगदी मोजकेच नागरिक सायकलीचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात करताना पाहायला मिळतात.

    अवगत विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होते खरी. मात्र, त्यामुळे आपल्या शरीरावर तसेच मनावर परिणाम होताना दिसतात. वयोमानानुसार उद्भवणाऱ्या व्याधी ज्यावेळी समोर येतात, त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असते. पूर्वी दुचाकीऐवजी सायकलचा वापर लोक करत होते. दैनंदिन कामांसोबत त्यांचा उत्तम व्यायामही होत असे. शरीर दणकट झाल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही उत्तम होती. मोठमोठ्या शहरांमध्ये शाळेतील विद्यार्थी सोडले तर सायकल वापरणारे नागरिक क्वचितच नजरेस पडतात. कोरोनासारख्या विषाणूशी दोन हात करायचे म्हटल्यावर रोगप्रतिकारशक्ती दणकट असणे अत्यावश्यक आहे.

    भिगवण सायकल क्लबच्या वतीने जागतिक सायकल दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व सदस्यांनी ४५ किमी अंतर पार पाडले आणि क्लबचे रणजित भोंगळे यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले. सायकल चालवून शरीर निरोगी आणि फिट ठेवा. यामध्ये रियाज शेख, संजय चौधरी, डॉ निंबाळकर, केशव भापकर, संतोष सवाने, प्रदीप ताटे, डॉ. मोरे, डॉ. अमित खानावरे, के. डी. भांडवळकर, योगेश चव्हाण, डॉ. खरड, नामदेव कुदळे, औदुंबर हुलगे, अल्ताफ शेख, अर्जुन तोडेकर, प्रवीण ढोले, सातरले, चितळकर, डॉ. भरणे यांनी भाग घेत जागतिक सायकल दिन साजरा करत शुभेच्छा दिल्या.