नदीकाठच्या घरांना यंदाही पुराचा धोका; ‘हे’ आहेत धोका असलेले भाग

  पिंपरी : राष्ट्रीय हरित लवादाने महापालिका प्रशासनाची कानउघडणी करुनही शहरातील नदीपात्रात भराव टाकून इमारती आणि घरे बांधली जात आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात अतिक्रमणदेखील होत आहेत. त्यामुळे यंदा पवना आणि मुळा नदीला पूर आल्यास नदीकाठावरील १५ भागांना त्यातही पिंपरी, सांगवीला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

  पवना आणि मुळशी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणी नदीत सोडले जाते. धरणातून जादा पाणी सोडल्यास नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा सामना करावा लागतो. २०१९ मध्ये शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. दाट लोकवस्ती, झोपडपट्टयांचे पुरात मोठ्या प्रमाणात रुपांतर झाले होते. पुरामुळे सुमारे ५ हजार ८०१ नागरिक बाधित झाले होते. पुरानंतर नदीपात्रातील भराव टाकण्याचे प्रकार आणि अतिक्रमणे थांबतील, अशी अपेक्षाही होती. राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेची चांगलीच कानउघडणी केली होती.

  नदीपात्रातील राडारोडा काढून घेऊन पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने कागदोपत्री कारवाई करीत अहवाल सादर केला होता. मात्र, प्रत्यक्षात जैसे थे स्थिती आहे. पवना आणि मुळा नदीचा काही भाग बुजविल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. या प्रकरणामुळे नदीपात्र अरुंद होऊन आकसत आहे. परिणामी, शहरावरील पुराच्या संकटाचे सावट आणखीन वाढले आहे. त्यामुळे पवना, मुळा नदीपात्रालगतच्या लोकवस्त्यांना यंदाही पुराचा धोका आहे. पवना नदीलगत १० ठिकाणी आणि मुळा नदी पात्रालगतच्या ५ ठिकाणांना धोका आहे.

  पुराचा धोका असलेले भाग

  पवना नदी : पिंपरीतील संजय गांधी नगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, भाटनगर, माता रमाईनगर, बौध्दनगर, चिंचवडमधील मोरया गोसावी परिसर, रहाटणी स्मशानभूमी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, सांगवी

  मुळा नदी : वाकडमधील ममतानगर, कस्पटे वस्ती परिसर, सांगवाी मुळा नदीकाठ, मधुबन सोसायटी, संगमनगर, पवनावस्ती, पिंपळे निलख, दापोडी, हॅरिस पुलाजवळ, बोपखेल, गणेशनगर परिसर

  महापालिकेचा पूर नियंत्रण कृती आराखडा

  संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच धोका टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पूर नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आपत्ती निवारणाशी संबंधित विभाग, तसेच प्रभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना कामकाज करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिल्या आहेत.