भोर तालुक्‍यात रस्त्यांची डागडुजी सुरू

महाड-पंढरपूर, भोर-कापूरहोळ रस्त्यावर खड्डे भोर : तालुक्‍यातील महाड-पंढरपूर, भोर-कापूरहोळ यांसह तालुक्‍यातील महत्त्वाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत

महाड-पंढरपूर, भोर-कापूरहोळ रस्त्यावर खड्डे

भोर : तालुक्‍यातील महाड-पंढरपूर, भोर-कापूरहोळ यांसह तालुक्‍यातील महत्त्वाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दोन आणि चारचाकी गाड्या खड्ड्यात आपटून अपघात होत असल्याने प्रवासी नागरिक खड्डे बुजवण्याची मागणी करीत होते, त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुरूम खडी टाकून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

भोर तालुक्‍यातील महाड-पंढरपूर, भोर-आंबवडे, टिटेघर-भोर, कापूरहोळ-भोर, आंबवडे-कोर्ले-रायरेश्‍वर,भोर-पसुरे या भागातील रस्त्यावर खड्डे पडून रस्ते खराब झाले होते, त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित रस्त्यांचे ठेकेदार यांची बैठक घेतली. यावेळी उपआभियंता आर. एल. ठाणगे, आणि शाखा अभियंता उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील खड्डे खडी व डांबराने बुजवण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे नियोजनही केले होते.

-लॉकडाऊनमुळे अनेक कामे मंजूर असूनही ठप्प

भोरमध्ये सतत पाऊस सुरू झाल्याने डांबराऐवजी खडी आणि मुरुम टाकून खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अनेक कामे मंजूरअसूनही ठप्प झाली होती, तर काही कामे अपूर्ण राहिली आहेत, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. भोर तालुक्‍यातून वरंधा घाटातून महाडला जाणारा भोर-महाड हा महत्त्वाचा रस्ता असून, या मार्गावरील २२ किलोमीटरपर्यंत खड्डे पडले असल्याने वाहन चालकांची दैना होत होती.

या खड्ड्यात मुरूम खडी टाकून बुजवण्याचे काम सुरू असून, सध्या भोर ते निगुडरपर्यत १५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. आंबेघर-आंबवडे रस्ता ११ किलोमीटर, आंबेघर-कोर्ले-रायरेश्‍वर रस्ता ९ किलोमीटर, भोर कापुरव्होळ रस्ता १५ कि. मी. चा आहे. या साऱ्या रस्त्यांवारील खड्डे बुजवाण्याचे हाती घेतले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर. एल. ठाणगे यांनी सांगितले.