संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील रोटीचा नागमोडी घाट होणार आता इतिहासजमा

  पाटस : जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणजेच पाटस ते बारामतीपर्यंत पालखीच्या राष्ट्रीय महामार्ग रूंदीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखीमार्गावर असलेल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या रोटीचा नागमोडी वळणाच्या घाटात हे काम सध्या सुरू आहे. या घाटात नागमोडी वळण आता राहणार नसून, सरळमार्ग अरूंद रस्ता होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी पालखीला या घाटातील नागमोडी वळणे राहणार नाहीत. हा घाट आता इतिहासजमा होणार आहे.
  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून केंद्रीय महामार्ग मंत्रायलयाने जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या या रस्त्यासाठी ५०० कोटी रूपयांचा भरीव निधी उपल्बध केला आहे. यामुळे हा भारतीय राजमार्ग अर्थात राष्ट्रीय महामार्ग (एन.एच.आय) चा दर्जा मिळाला आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी या महामार्गासाठी पाटस ते बारामतीपर्यंत या महामार्गाच्या रस्ता रूंदीकरणासाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून सर्वेक्षण करण्यात आले होते. हे सर्वेक्षण आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे  हा महामार्गाच्या रुंदीकरण आता कोणत्या ठिकाणावरून होणार आहे,  हे जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
  रुंदीकरणाच्या कामास सुरुवात
  संत तुकाराम महाराज राष्ट्रीय पालखी मार्गाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या देखरेखेखाली पाटस ते बारामती पर्यंतच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पाटस हद्दीतून पालखी मार्गाच्या रस्त्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा दरवर्षी वरवंड येथील मुकाम आटोपून पाटस येथे विश्रांती घेतल्यानंतर पाटस पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रोटीच्या नागमोडी वळणाच्या घाटातून नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या हिरव्यागार डोंगरातून भक्तीमय वातावरणाने संत तुकाराम महाराजांचा जयघोष करीत पंढपुरकडे मार्गस्थ होत असते.
  रोटी घाटात पालखी आल्यावर या पालखीला दहा ते बारा बैलजोडीलावून रोटीचा घाटाचा हा टप्पा पार करावा लागतो. रोटीघाटातील हा पालखी सोहळा पाहण्यासाठी दौंडसह शिरूर,श्रीगोंदा इंदापुर या तालुक्यातील भक्त येत असतात. आपल्या कॅमेरात हे दृश्य टिपण्यासाठी सर्व मीडिया या घाटात पालखी सोहळ्याच्या आगमानाची वाट पहात असतात. मात्र, आता या रोटीच्या या नागमोडी घाटात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पूर्वीसारखा पाहावयास मिळणार नाही.
  राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात नागमोडी वळण कमी करण्यात येणार असून, सरळ मार्ग रस्ता काढण्यात येणार आहे. कदाचित पुढील वर्षी संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला रोटी घाटातील नागमोडी वळण नसणाऱ्या पुढील काळात या पालखी मार्गावरील रोटीचा हा घाट इतिहास जमा होणार आहे.