रासपकडून नवीन कृषी विधेयकांचे समर्थन : महादेव जानकर

यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविणार

बारामती: राष्ट्रीय लोकशाही आघाडी(रालोआ) चा घटकपक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष तीन्ही कृषि कायद्यांचे समर्थनच करीत असल्याचे सांगून नवीन कृषी कायद्यांनंतरही शेती मालाची किमान आधारभूत किंमत,हमीभाव,बाजार समित्यांचे आस्तित्व “जैसे थे” राहाणार असल्याची हमी केंद्र सरकारने दिली असल्याची माहिती रासपचे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर यांनी बोलताना दिली.

रासप यापुढेही एन डी ए चा घटकपक्ष राहाणार आहे, मात्र यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका रासप स्वबळावर लढणार आहे.त्यासाठी पक्ष कार्यकर्त्त्यांनी स्थानिक प्रश्नांवर जनतेचा आवाज व्हावे,असे आवाहन जानकर यांनी प्रमुख पदाधिकारी, विविध प्रभारी व निवडक कार्यकर्त्यांच्या बारामतीतील बैठकीत केले. अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय संघटक पंडीतराव घोळवे होते.

यावेळी जानकर म्हणाले,मोदी विरोधक काही संघटनांच्या आडून नवीन कृषी विधेयकांबद्दल शेतकरी वर्गात भ्रम पसरविण्याचे काम करीत आहेत. काॅग्रेस प्रणित युपीए सरकारनेही अशा कृषी सुधारणांबाबत आग्रह धरलेला होता.आताही नवीन कायदे लागू झाल्यानंतरही बाजार समित्यांचे आस्तित्व, आधारभूत किंमत, हमीभाव ही धोरणे अबाधित राहाणार आहेत.तशी लेखी हमी केंद्र सरकारने दिलेली आहे. याउलट नवीन कायद्यांमुळे शेती क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढून शेतकर्‍यांना अधिकचे चार पैसे मिळण्यात मदतच होणार आहे. मध्यंतरीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहुचर्चित भेटीचा उल्लेख न करता जानकर म्हणाले,जनतेच्या प्रश्नांवर किंवा व्यापक हितासाठी गरजेनुसार इतर पक्षाच्या प्रमुखांना,मंत्र्यांना भेटणे गैर नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा चर्चांऐवजी पक्षसंघटन मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. जनतेच्या स्थानिक प्नश्नांवर जनतेचा आवाज व्हावे. पक्षाचे वतीने मार्च २०२१ अखेर ५० लाख सक्रीय सभासद नोंदणी केली जाईल.त्यासाठी अॅपची निर्मिती केली असल्याचे जानकर यांनी सांगितले. यावेळी राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले,प्रभारी माणिकराव दांगडे पाटील,ज्ञानेश्वर सलगर,आण्णासाहेब पाटील,नितीन धायगुडे,अजित पाटील,वैशाली विरकर सुवर्णा जर्‍हाड पाटील,कविता माने,पोपट क्षीरसागर, उमाजी चव्हाण,शरद बाचकर, संदीप चोपडे,अॅड.अमोल सातकर यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.