नियमबाह्य अवजड वाळू व खडी वाहतुकीला आरटीओचा आश्रय ?

दौंड : बारामती आरटीओ (RTO)खात्याच्या अधिकाऱ्यांच्या ‘अघोषित करारा’नेच महामार्गावर नियमबाह्य अवजड वाळू व खडी वाहतुकीची वाहने धावण्याची हिम्मत करत असल्याचे चित्र दौंड तालुक्यात दिसत आहे.

वाहनांच्या क्षमतेपेक्षा व नियमाच्या अधिक माल वाहतूक केल्यास आरटीओच्या ताब्यात वाहन गेले की, पुन्हा भरपूर दंड भरल्याशिवाय सुटत नाही, अशी कधीकाळी वाहनधारकांमध्ये असलेली भीतीच आता नाहिशी झाली आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियमबाह्य अवजड वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई होणार नाही, असा संदेश जारी केल्यासारखे वातावरण सध्या दौंड तालुक्यात पहावयास मिळत आहे. प्रचंड महाकाय टिप्पर, ट्रक या सारखे अनेक अवजड वाहने मार्गावर प्रचंड संख्येने धावत असल्याचे चित्र तालुक्यात आता सवयीचे झाले आहे.

पाटस बारामती रस्त्यावर शेकडोच्या संख्येने अवजड वाहने गौण खनिजाची वाहतूक करत असताना दिसत आहेत. यामध्ये खडी व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही संख्या लक्षणीय आहे. एवढ्या प्रचंड संख्येने वाहने अवजड वाहतूक असलेला तालुका म्हणून दौंड तालुका आता नावा रूपाला येत आहे. क्षमतेपेेेक्षा अधिक अवजड वाहतुकीमुुुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे, अवजड वाहने
मार्गावर धावत असल्याने अपघाताच्या संख्येतही भर पडत आहे. नियमबाह्य अवजड खडी व वाळू वाहतुकीला बारामती आरटीओचा आश्रय असल्याचे यक्षप्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात बारामती उप-प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संजय धायगुडे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही,

धुडगूस वाढला

दौंड तालुक्यात नियमबाह्य अवजड वाळू व खडी वाहतुकदारांची वाढलेली हिंमत ही आरटीओ अधिकाऱ्यांच्या पूर्ण मूकसंमतीचाच प्रकार असल्याची चर्चा जोमात चालू आहे. पाटस बारामती रस्त्यावर खडी वाहतूकीच्या वाहनांना तर आरटीओंची हिरवी झेंडी असल्याचे उघड चर्चा आहे. यामुळे तालुक्यातील मुख्य मार्गावर सर्रास नियमबाह्य अवजड खडी व वाळू वाहतुकीचा सुळसुळाट झालेला दिसत आहे,
दरम्यान, अवजड वाहतूकीमुळे तालुक्यातील रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने आरटीओ विभागाने नियमबाह्य अवजड खडी व वाळू वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कडक कारवाईचा बडगा उचण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.