एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ झाल्याच्या अफवेमुळे प्रवासी संख्या घटली

मंचर : पुणे जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या बसेस सुरु झाल्या आहेत. एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ झाल्याची अफवा नागरिकांमध्ये पसरल्याने त्याचा परिणाम प्रवासी संख्या कमी झाली आहे. एसटी महामंडळाने कोणत्याही प्रकारे तिकिटात दरवाढ केली नसल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती मंचर एसटी बसस्थानकाचे वाहतुक नियंत्रक संभाजी दाते यांनी सोमवारी दिली.

-नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे

देशभरात कोरोनाव्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात मागील चार महिने राज्य परिवहन महामंडळाने बसेस बंद केल्या होत्या.परंतु लॉकडाऊन शिथील  केल्यानंतर सध्या एसटी महामंडळाच्या वतीने महत्वाच्या मार्गांवर पुन्हा बससेवा सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी एसटीचा उपयोग होणार आहे. परंतु नागरिकांमध्ये राज्य परिवहन महामंडळाने तिकिटाची दरवाढ केली असा गैरसमज पसरला आहे. हि अफवा असुन कोणत्याही प्रकारची दरवाढ झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नागरिकांनी एसटीने प्रवास करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक व दहा वर्षे वयोगटाखालील लहान मुलांसाठी एसटीचा प्रवास बंद आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी एसटीने प्रवास करु नये. असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. इतर नागरिकांसाठी प्रवास सुरु झाला असून नागरिकांनी मास्कचा वापर करुन एसटीतून प्रवास करण्याचे आव्हानही एसटी महामंडळाने केले आहे. सध्या ग्रामीण भागात सर्वत्र संचारबंदीमध्ये शिथीलता आली असून सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत. परंतु नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक नागरिकांकडे स्वतःची चारचाकी किंवा दोनचाकी गाडी नसल्याने नागरिकांना प्रवासात अडचण येत होती. त्यामुळे एसटी महामंडळाने सध्या प्रवाशांसाठी महत्वाच्या मार्गांवर एसटी सेवा सुरु केली आहे.