राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकीकडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती.

    पुणे:  विविध सामाजिक, राजकीय विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर विरोधी पक्षातील महिला नेत्यांना कायम चोख प्रत्युत्तर देताना दिसतात. त्यातच आता रुपाली चाकणकर यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

    रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकीकडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्यामुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती.

    दोन दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलं होत की, आज वसुली सुरू आहे की ? कोणी मला सांगेल का #MaharashtraBandhNahiHai. अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

    रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल होतं की, वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो?? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी.