खेड तालुक्यातील पाईट व डेहेणे येथे होणार ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर : निर्मला पानसरे

  राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट व डेहेणे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे (Nirmala Pansare) यांनी दिली.

  खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना कुटुंबातील व्यक्ती आजारी पडल्यास उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय चांडोली व चाकण या ठिकाणी जावे लागते. चांडोली व चाकण येथिल ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी २ ते ३ तास लागतात.खासगी रुग्णालयायातील महागडी आरोग्य सेवा ग्रामीण भागातील नागरिक तसेच आदिवासी बांधव यांना परवडत नाही. खेड तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने तसेच वाढती लोकसंख्या विचारात घेता चांडोली व चाकण या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर उभारल्यास नागरिकांना मोफत चांगल्या दर्जाच्या अत्याधुनिक सोयी सुविधा अगदी जवळच्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात.

  तसेच कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता भविष्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर मध्ये होणे गरजेचे होते. या संदर्भात खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पालकमंत्री अजित पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिले होते.

  पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पुणे जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये रूपांतर करून मंजुरी द्या असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला होता. त्याला जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर, मुळशीतील पिरंगुट, खेड तालुक्यातील पाईट व डेहेणे, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे ग्रामीण रुग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी द्या, अशी मागणी करण्यात आली.

  हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्याला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मान्यता देऊन कामाच्या कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

  खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाची व्यापारी बाजारपेठ असणाऱ्या पाईट व डेहेणे येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये होण्यास मंजुरी मिळाल्याने पाईट व डेहेणे तसेच पश्चिम भागातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते-पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांचे आभार मानले आहेत.