भाजीपाला, फळे व वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी आता ‘सुरक्षा बॉक्स’ ; नववीच्या विदयार्थ्याने केली निर्मिती

समाजातील दुर्बल घटकांपर्यंत हा बॉक्स पोहोचवण्याच्या उद्देशाने आदित्यने 'नेक्स्टजेन इनोव्ह ८' नावाचे स्टार्टअप सुरू केले. या माध्यमातून या बॉक्सची निर्मिती करून ते गरीब भाजी विक्रेत्यांना देण्याचा त्याचा मानस आहे. नुकतेच आदित्यने असे बॉक्स दादर येथील भाजीविक्रेत्यांना दिले. तर, नजीकच्या काळात ५० हजार असे बॉक्स तयार करून गरिबांना वाटप करण्याचा आदित्यचा निर्धार आहे. या संशोधनात आपल्या वडिलांनी मोलाची साथ दिली असून शाळेनेही अभ्यासात काहीशी सवलत दिल्याचे आदित्य सांगतो.

    पिंपरी: कोरोना काळामध्ये बाहेरून घरात येणारा भाजीपाला, फळे तसेच अनेक वस्तूंचे विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी पुण्यात नववीत शिकणाऱ्या विदयार्थ्याने ‘सुरक्षा बॉक्स’ची निर्मिती केली आहे. भाजीपाला, किराणा साहित्य, वॉलेट, नोटा, मोबाईल, पेन, घड्याळ आदी वस्तुंना या बॉक्समध्ये ठेऊन त्यांचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. कोरोनासह सर्व प्रकारचे विषाणू, जिवाणू, जंतू, बुरशी आदी नष्ट करण्यासाठी हा सुरक्षा बॉक्स उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या या बॉक्सला कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्चनेही (सीएसआयआर) मान्यता दिली आहे.

    पुण्यातील इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या आदित्य पाचपांडे या विदयार्थ्याने हा महत्वपूर्ण शोध लावला आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्चकडे (सीएसआयआर) हे संशोधन प्रमाणित करण्यासाठी पाठविले. सीएसआरआयने संशोधन प्रमाणित करून वापरास योग्य असल्याचे सांगितले आहे. कोरोना संसर्ग काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा सुरू होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना मोकळा वेळही मिळत होता. त्याचा सदुपयोग करण्याचे आदित्यने ठरविले. त्यावेळी भाज्यांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काहीच उपाय नसल्याचे त्याला जाणवले. यावर काय करता येईल, याबाबत त्याने विचार करण्यास सुरूवात केली. त्याला त्याचे वडील औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले. यूव्ही प्रकाशाच्या आधारे हे निर्जंतुकीकरण होऊ शकते, याचा विचार करण्यास त्याने सुरुवात केली. त्यानुसार, त्याने निर्जंतुकीकरणासाठी सुरक्षा बॉक्सची निर्मिती केली. मात्र, प्रकाशाचे परावर्तन होत नव्हते. मग आदित्यने त्यावर अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर केला. या बॉक्समध्ये यूव्ही – सी प्रकाशाचा वापर यशस्वीपणे केला आहे. आदित्यने ‘नेक्स्ट जेन इनोव्हेट सोशल फाऊंडेशन’ सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून गरीब, गरजू आणि कोरोनाच्या फ्रंटलाईन वर्कर’ यांना हा बॉक्स दान करण्याचे नियोजन शाळेने केले आहे. त्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी त्याने संकेतस्थळाच्या माध्यमातून कॅम्पेन सुरू केले आहे.

    समाजातील दुर्बल घटकांपर्यंत हा बॉक्स पोहोचवण्याच्या उद्देशाने आदित्यने ‘नेक्स्टजेन इनोव्ह ८’ नावाचे स्टार्टअप सुरू केले. या माध्यमातून या बॉक्सची निर्मिती करून ते गरीब भाजी विक्रेत्यांना देण्याचा त्याचा मानस आहे. नुकतेच आदित्यने असे बॉक्स दादर येथील भाजीविक्रेत्यांना दिले. तर, नजीकच्या काळात ५० हजार असे बॉक्स तयार करून गरिबांना वाटप करण्याचा आदित्यचा निर्धार आहे. या संशोधनात आपल्या वडिलांनी मोलाची साथ दिली असून शाळेनेही अभ्यासात काहीशी सवलत दिल्याचे आदित्य सांगतो.