केंद्र शासनाच्या  पंतप्रधान आवास योजनेस मंजुरी

भिमाशंकर: आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द, कळंब, काठापूर येथील सरकारी जमिन व गायरान जमिन या  केंद्र शासनाच्या, “ पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी २०२२” या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे तर्फे गटविकास अधिकारी आंबेगाव यांना परवानगी दिली असल्याची माहिती पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी दिली. शासन निर्णय १९ सप्टेंबर २०१६ च्या तरतुदीनुसार केंद्र शासनाच्या, “प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी २०२२” या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना परवडणारी घरे होण्यासाठी अवसरी खुर्द व काठापुर येथील ग्रामपंचायत यांनी सरकारी जमिन आणि कळंब येथील ग्रामपंचायत यांनी गायरान जमिन ग्रामसभेच्या ठरावाव्दारे प्रधानमंत्री आवास योजनेकरिता मिळावी यासाठी गटविकास अधिकारी आंबेगाव यांचेकडे मागणी केली होती. त्यानुसार तहसिलदार आंबेगाव यांनी संबंधित जमिन वाटप करणेस हरकत नाही, असा अहवाल उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव यांना दिला. त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४० व महाराष्ट्र जमीन महसूल नियम ५ अन्वये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासन निर्णयानुसार अवसरी खुर्द व काठापूर येथील सरकारी जमिन आणि कळंब येथील गायरान जमिन पंचायत समिती आंबेगाव गटविकास अधिकारी यांना “प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी २०२२” या योजनेसाठी काही अटी व शर्तीनुसार देण्यात आली असल्याचे सभापती संजय गवारी यांनी सांगितले.