उरुळी कांचनचा दूरदृष्टीने कारभार : संताेष कांचन

  उरुळी कांचन : उरुळी कांचन हे गाव हवेली शिरूर व दौंड या तीन तालुक्यांच्या सीमेवर महत्त्वाची बाजारपेठ असणारे नगरपालिकेच्या तोडीची लोकसंख्या असलेले गाव आहे. याठिकाणी मागील दहा वर्षापासून प्रबळ स्थानिक नेतृत्व कार्यरत नसल्याने नवीन तरुण कार्यकर्ते व त्यांचे समर्थक हेच गावचा गाडा चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी व दिशा ठेवून कारभार करण्याचा मानस आहे, असे उरुळी कांचनचे युवा सरपंच संतोष कांचन उर्फ पप्पू कांचन यांनी बाेलून दाखविला.

  काेराेनामुक्त गावासाठी प्रयत्नशील

  सरंपच कांचन म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आरोग्य विभागाला मदत करून गाव कसे कोरोनामुक्त होईल, यावर आमचा भर आहे. लसीकरणावर भर देत आहोत. परंतु शासनाकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने अडचण झाली आहे. उरुळी कांचन हे गांव २०११ च्या जंगणनेनुसार कागदावर सुमारे तेहतीस हजार तर अनधिकृत एक लाख लोकवस्ती असणारे गाव आहे. शिवाय बाजारपेठ असल्याने फ्लोटिंग लोकसंख्या निराळीच आहे. सुविधा उपलब्ध करून देताना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व शासन यांनी सहकार्य करून दिशा देण्याचे काम करून प्रश्न निकाली काढण्यास चालना दिली पाहिजे. पाणीपुरवठा योजना, कचरा निर्मूलन, रस्ते विकास, आरोग्य सुविधा व जलनिस्सारण या महत्वाच्या मूलभूत टप्प्यांवर काम करणार असल्याचे सरपंच संतोष कांचन यांनी सांगितले.

  प्राधान्याने साेडविणार कचरा समस्या

  उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ज्या समस्या महत्वाच्या आहेत. त्यामध्ये कचरा उचलणे व कचरा निर्मुलन हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. उरुळी कांचनमध्ये दररोज सुमारे १४ ते १६ टन कचरा निर्माण होत आहे. परिसरातील वाढलेल्या नागरिकरणाने त्यामध्ये दिवसागणिक वाढच होत आहे. हा कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीकडे असणारे मनुष्यबळ आणि वाहतूक साधने कमी पडत अाहेत. कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे, ही गोष्ट ग्रामपंचायतीच्या आवाक्याच्या बाहेर आहे. यावर मात करून हा प्रश्न भविष्यात प्राधान्याने सोडविणार आहे. दोन ट्रॅक्टर, त्यावर प्रत्येकी तीन कामगार व सहा टेम्पो (घंटागाडी) अशी यंत्रणा ग्रामपंचायतीकडे आहे, एकूण सहा प्रभागातून या यंत्रणेला कचरा उचलावा लागतो, असे सरंपच कांचन यांनी सांिगतले.

  पाणी पुरवठा याेजनेचा प्रस्ताव पडून

  उरुळी कांचन पुणे शहरालगतच्या मोठ्या लोकसंख्येचे व हवेली-दौंड या तालुक्यांच्या सीमेवरचे मोठे गाव. परंतु या गावात पिण्याच्या पाण्यासाठी अद्याप पूर्ण क्षमतेची पाणी पुरवठा योजना नाही, हे सत्य आहे. या गावाच्या लोकसंख्येला सध्यस्थितीत एकवेळ पिण्याचे पाणी पुरवठा करायचे झाले तर सुमारे २० ते २५ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. परंतु पाणीटंचाईमुळे ते शक्य होत नाही. हा महत्वाचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व १७ सदस्य प्रयत्नशील आहोत. मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी यासाठी सहकार्य करीत नाहीत. त्यांच्या वेळकाढूपणामुळे गेल्या सुमारे पाच-सहा वर्षांपासून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. या भागातील आमदार व खासदारांनी या कामी ग्रामपंचायतीला सहकार्य करून लवकरात लवकर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवून द्यावी, अशी अपेक्षा सरपंच कांचन यांनी व्यक्त केली.
  ”पोलीस प्रशासनाने बेशिस्त वाहनचालकांवर, बेशिस्त वाहन पार्किंगवर, महात्मा गांधी विद्यालय रस्ता व आश्रम रस्ता या ठिकाणी रस्त्यात अतिक्रमण  करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. व्यावसायिकांनी अतिक्रमण न करता कारवाई करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आणू नये”.
  – संताेष कांचन, सरपंच
  (शब्दांकन : सुनिल जगताप)