एक महिन्यापासून फरारी असलेला सराईत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई वाघोली : (ता. हवेली) उरूळीकांचन येथे झालेल्या खुनी हल्ल्यातील एक महिन्यापासून अभिलेखावर असलेला फरारी सराईताला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने अटक

स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
वाघोली :
(ता. हवेली) उरूळीकांचन येथे झालेल्या खुनी हल्ल्यातील एक महिन्यापासून अभिलेखावर असलेला फरारी सराईताला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पथकाने शिताफीने अटक केली आहे.  

दत्ता उर्फ भावडया भिमा लोंढे (वय ३० वर्षे रा.उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरळीकांचन येथील आकाश लोंढे गुरुवार (दि.७ मे) रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास आकाश अशोक लोंढे मोटरसायकलवरून डाळींब-उरूळीकांचन रोडने जात होते. आकाश लोंढे यांना आडवून पूर्वी झालेल्या शाब्दीक बाचाबाचीचे कारणावरून शिविगाळ, दमदाटी करून आरोपी दत्ता भिमा लोंढे याने इतर पाच साथीदारांसह तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून कोयता, लोखंडी रॉड, दांडक्यानी म्हणून गंभीर मारहाण दुखापत व डोक्यावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता. याबाबत आकाश लोंढे याने हॉस्पीटलला उपचार घेत असताना दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हयातील ६ आरोपींपैकी ५ आरोपी अटक करण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपी दत्ता लोंढे हा फरार होता.

आरोपी दत्ता लोंढे हा अट्टल गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापूर्वी लोणीकाळभोर, अहमदनगर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मारहाण दुखापत, गर्दी मारामारी, गावठी हातभट्टी गाळणे असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्ता लोंढे हा गावातील मोलमजुरी करणारे तसेच फेरीवाले, हातगाडी, टपरीचालक यांचेकडून दमदाटी करून फुकट खाणे, पैसे लुबाडणे असे प्रकार करत असल्यामुळे त्याची परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे  त्याचे विरुद्ध कोणी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. लॉकडाऊन कालावधीत खुनी हल्ल्याचा हा गंभीर गुन्हा घडला होता. फरार आरोपी लोंढे याला पकडनेकामी संबधित पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. परंतु आरोपी हा सराईत असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोहवा महेश गायकवाड, निलेश कदम तसेच उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस नाईक सोमनाथ चितारे, सचिन पवार यांचे पथक उरुळीकांचन परिसरात संचारबंदी अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पथकास फरारी आरोपी हा उरुळीकांचन तारा हॉटेल रोड येथे येणार असलेबाबत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरुन मुख्य आरोपी दत्ता लोंढे यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्हयाचा अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.