सणसवाडीचा करू लाेकाभिमूख कारभार : सरपंच सुनंदा दरेकर

  कोरेगाव भीमा : सरपंच गावचा प्रथम नागरिक असताे, याची जाणीव ठेऊन लाेकाभिमूख कामावर भर देण्यात येईल. एक महिला जसे आपले घर कुटूंब चालवते, तसे गाव माझे एक कुटूंब आहे. या भावनेतून गावचा कारभार करण्यात येईल. शिक्षण, स्थानिकांना रोजगार, ग्रामस्वच्छता, आरोग्य सेवा यांना विशेष प्राधान्य देणार आहे, असे सणसवाडी (ता. शिरूर) येथील सरपंच सुनंदा दरेकर यांनी सांगितले.

  उद्योग व्यवसाय उभारणीस प्राेत्साहन

  मराठी शाळासाठी सभागृह बांधण्याचा मानस आह. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिपूर्ण व आधुनिक सोयीसुविधांयुक्त स्पर्धा परीक्षा केंद्र व ग्रंथालय उभारले जाणार आहे. गावात मोठ्या प्रमाणात वाढणारे नागरिकरण व औद्याेगिकीकरण यामुळे पायाभूत सोयी सुविधांवर ताण येत अाहे. सांडपाणी, बंदिस्त गटार लाईन, साधा कचरा व घन कचरा व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी, पथदिवे, महिलांचे व बालकांचे आरोग्य, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबन, लघु उद्योग व्यवसाय उभारणीस प्राेत्साहन, कचरा मुक्त गाव, निर्मल ग्रामचे ध्येय ग्रामपंचायतीने ठेवले आहे, असे सरपंच दरेकर यांनी नमुद केले.

  आरोग्य उपकेंद्र उभारणार

  सणसवाडीसह परिसरातील नागरिकांना अाराेग्य सुिवधा िमळावी, यासाठी आरोग्य उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. सध्या कोरोना रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन ही पंचसूत्री राबविणार अाहे. ग्रामस्थ, व्यापारी याचे आवश्यकतेनुसार रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासणी, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण, गरीब कुटुंबासाठी ‘कोरोना सेफ्टी कीट’ देणे अशा विविध उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. कोरोना हॉटस्पॉट असलेले सणसवाडी गाव कोरोना विळख्यातून सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

  लहान मुले, ज्येष्ठांसाठी गार्डन

  नरेश्वर मंदिर परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करून त्यांना जगवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे. लवकरच नरेश्वर मंदिर परिसरात ‘मीयावाकी’ नैसर्गिक प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येईल. यासाठी सुगंधी, आकर्षक फुल व फळ झाडांची लागवड केली जात आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरगुंळा मिळावा, यासाठी नैसर्गिक सौंदर्याने भरलेले गार्डन तयार करणार आहे. योगा, मेडिटेशन यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे
  सरपंच सुनंदा दरेकर यांनी सांगितले.

  गाव कोरोनामुक्त करणार

  कोरोनासारख्या महामारीत गाव कोरोनामुक्त कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील पाच महिन्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या राेखण्याचे मोठे आव्हान होते. मात्र आरोग्य व महसुल विभाग, पंचायत समिती, पोलीस प्रशासन यांच्याशी सातत्याने समन्वय साधला. सर्व सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकास कामांचे वाॅर्ड, प्रभागनुसार नियोजन करणे, नवीन कामांना मंजुरी मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे, सर्व भागात जास्तीत जास्त विकास कामे करणे, अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणे, सांडपाण्यासाठी सर्व भागात भुयारी गटार याेजना राबविणे, स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करून देणार आहे, असे सरंपच सुनंदा दरेकर यांनी सांगितले.

  ”विकास कामात वाड्यावस्त्यांना न्याय देणार आहे. विकास कामे करायची आहेत. कमी वेळात करणं शक्य नाही. परंतु सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दीर्घ नियोजन केले आहे. ग्रामस्थांची साथ मिळाल्यास काहीच अशक्य नाही. नागरिकांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. विकास कामातून गावचा कायापालट करण्यात येईल”.

  – सुनंदा दरेकर, सरपंच, सणसवाडी

  (शब्दांकन : उदयकांत ब्राम्हणे)