सरपंचपद हे सर्व साधारण पुरुष वर्गाला परंतु सत्तेची मदार मात्र बोगस मतदारावर

लोणी काळभोर  : ग्रामपंचायत सरपंच पद हे सर्व साधारण पुरुष वर्गाला पडल्याने लोणी काळभोर मधील राजकीय गोट्यात कळी फुलली असली तरी सत्तेची मदार मात्र बोगस मतदारावर अवलंबून असल्याचे मतदार यादी छाननी प्रक्रियेत पुढे आले आहे.

लोणी काळभोर  : ग्रामपंचायत सरपंच पद हे सर्व साधारण पुरुष वर्गाला पडल्याने लोणी काळभोर मधील राजकीय गोट्यात कळी फुलली असली तरी सत्तेची मदार मात्र बोगस मतदारावर अवलंबून असल्याचे मतदार यादी छाननी प्रक्रियेत पुढे आले आहे.

पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, थेऊर, आळंदी म्हातोबाची, वळती, शिंदवणे, भवरापूर, कोरेगाव मूळ, तरडे या अकराहून अधिक ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत. निवडणूक आयोगाने या सर्व अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या नुकत्याच प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्या प्रसिद्ध होताच, निवडणुक लढवणाऱ्या काही इच्छुकांनी या मतदार याद्यांची पाहणी केली असता हवेली तालुक्‍याच्या सीमेवरील मात्र दौंड तालुक्‍यातील हजारो नागरिकांची नावे उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडीसह वरील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत आली असल्याचे लक्षात आले.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत पाचशेहून अधिक तर लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एकाच प्रभागात एकाचवेळी चारशे तीन मतदारांची नोंदणी झाल्याचे आढळून आले. हि नावे दौंडमधील असल्याचे आढळले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्याची पाहणी करताना अधिकाऱ्यांना हाताशी धरुन दौंड तालुक्‍यातील हजारो मतदार हवेली तालुक्‍यातील विविध ग्रामपंचायतींच्या मतदार यादीत घुसवल्याची तक्रारारी  जिल्हाधिकारी व हवेलीचे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.