
कुकडी नदीच्या काठी आणि नजीकच्या परिसरात प्राचीन काळातील विकसित मानवी संस्कृती असल्याचे दिसून येते आहे. नदीकाठच्या परिसरात यापूर्वी अनेकदा ऐतिहासिक व प्रागैतिहासिक अवशेष सापडलेले आहेत.
पुणे : जुन्नर येथील दिल्ली पेठेजवळ कुकडी नदीच्या तीरावर पांढरीच्या टेकडीवर सातवाहनकालीन अवशेष सापडल्याची माहिती इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे यांनी दिली.
पांढरीच्या टेकडीवर नव्या इमारतीसाठी पाया खोदण्याचे काम सुरू असताना सुमारे १० ते १५ फूट खोल अंतरावर एक आगळा-वेगळा दगडी पाटा, भाजलेल्या मातीचे भांडे व भांड्याचे अवशेष सापडले. हे अवशेष सुमारे दोन हजार दोनशे वर्षापूर्वीच्या सातवाहन काळातील आहेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
येथे याआधी सापडलेल्या अवशेषाबाबत डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्त्व अभ्यासकांनी संशोधनाअंती हे अवशेष सातवाहनकालीन असल्याचा निर्वाळा दिला आहे. पुरातत्व संशोधक व विद्यार्थ्यांना त्यावर अभ्यास करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे, असे ताम्हाणे यांनी सांगितले.
कुकडी नदीच्या काठी आणि नजीकच्या परिसरात प्राचीन काळातील विकसित मानवी संस्कृती असल्याचे दिसून येते आहे. नदीकाठच्या परिसरात यापूर्वी अनेकदा ऐतिहासिक व प्रागैतिहासिक अवशेष सापडलेले आहेत. प्राचीन जुन्नरची वस्ती कुकडी नदीच्या काठापासूनही काही अंतरावर पसरल्याचा निष्कर्ष काढता येतो.
बापूजी ताम्हाणे, इतिहास अभ्यासक