३ जानेवारीपर्यंत पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळा राहणार बंदच

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबत पालक फारसे सकारात्मक नाहीत, असे चित्र आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य ही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व घटकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत -महापौर

 

पुणे: पाल्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसादावरून शहरातील महापालिका व खासगी शाळा येत्या तीन जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. ‘कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र असे असले तरी शाळा सुरु करण्याबाबत पालक फारसे सकारात्मक नाहीत, असे चित्र आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य हाही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व घटकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत’. असेही महापौर म्हणाले,

पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापौर मोहोळ यांनी पालक संघटना चर्चा करत आणि कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत. गेल्यावेळी शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांचे अवघे ५ टक्के हमीपत्र जमा झाले होते. यावेळीही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही ३ जानेवारी पर्यंत शाळा बंदच

पिंपरी चिंचवड शहरात अजुनही कोरोना विषाणूची भिती कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा/ महाविद्यालय उघडण्यासंदर्भात कोरोना विषाणूच्या परिस्थितीचा आढावा घेवुन ३ जानेवारी २०२१ नंतर महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता १३ डिसेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. सद्या पालकांची संमतीपत्र घेणे सुरु आहे. आत्तापर्यंत महापालिकेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फक्त ११३२ संमतीपत्रे प्राप्त झाली आहेत. यामुळे तुर्तास शाळा सुरु करणे योग्य रहाणार नाही. या अगोदरच शासनाने स्थानिक पातळीवर यासंदर्भात निर्णय घेण्याचे शासन आदेशात नमूद केलेले आहे.  शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा निर्जंतुकीकरण, तापमान मोजणीसाठी गन, डिजिटल थर्मामिटर, हात धुण्याची व्यवस्था, सोशल डिस्टनसिंग प्लॅन इत्यादी गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यामुळे ३ जानेवारी २०२१ पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शाळा बंदच रहाणार आहेत.