नोकरीच्या बहाण्याने लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या मालमत्ता सील

तालुका पोलिसांनी कार्यालये केली सील
बारामती: बहुचर्चेचा विषय बनलेल्या कऱ्हावागज (ता.बारामती)  येथील यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावाखाली जाधव दांपत्याने अनेक जणांकडून शिक्षण भरती, शिपाई भारतीच्या नावाखाली फसवणूक करून अपहार केलेल्या पैशातून बारामती तालुक्यासह माळशिरस तालुक्यात खरेदी केलेली मालमत्ता व बांधकाम करण्यात आलेली कार्यालये न्यायालयाच्या आदेशानुसार बारामती तालुका पोलिसांनी सील केले आहेत. मंगळवार (दि.२२) रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.

-नोकरीच्या बहाण्याने लाखो रुपयांना गंडा
जाधव दांपत्याने बोगस संस्था तयार करणे, बोगस नेमणुका देणे, खोट्या सह्या करणे, खोटे रजिस्टर तयार करणे, तरुणांनी नोकरीच्या बहाण्याने लाखो रुपयांना गंडा घालणे असे अनेक गैरप्रकार ग्रामीण पोलिसांनी पत्रव्यवहार करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून मालमत्ता सील करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने देखील पोलिसांच्या मागणीनुसार  जाधव दांपत्याची मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले होते. बचेरी (ता.माळशिरस) येथील भक्ती प्रतिष्ठान बारामती शिक्षण संस्थेच्या अंतर्गत सदगुरू गुरुकुल या विनाअनुदानित  शाळेत अनेक जणांकडून नोकरीच्या बहाण्याने लाखो रूपये उकळून त्या पैशातून कर्हावागज (ता. बारामती) येथे मूकबधिर विद्यालयाची जागा व शाळेचे बांधकाम केले होते. तसेच बचेरी ( ता.माळशिरस ) येथे घेण्यात आलेली मालमत्ता पोलिसांनी सील केले आहे. अशी माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी दिली.

-मूकबधिर विद्यालयाचे कार्यालय सील
याबाबत येथील यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाच्या दांपत्यासह मध्यस्थी करणाऱ्या एका विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार बारामती तालुका पोलिसांनी कर्हावागज येथील मूकबधिर विद्यालयाचे कार्यालय सील केले आहे. तर बांधकाम विभागाचे अभियंता अनिल गुजर, एस, एन, हिंगसे यांनी पंच म्हणून कामकाज पाहिले. वृत्तपत्रात दिलेल्या जाहिराती नुसार अनुदानित संस्थेत शिपाई या पदावर नोकरीला लावण्याच्या बहाण्याने दोघांकडून ९ लाख ८० हजार रुपयांची रक्कम घेऊन चार वर्ष काम करून पगार न दिल्याने दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात शिक्षण प्रसारक मंडळ चालक दांपत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपी नितीन जाधव तुरुंगाची हवा खात असून, रामेश्वरी जाधव व गणेश गोडसे सध्या फरार आहेत. याप्रकरणी फिर्यादी  मंगलसिंग गारद्या वसावे  ( वय २५ ) (रा. काकडदा, ता. घडगाव, जि. नंदूरबार) यांनी गुन्हा दाखल केला होता. वसावे व त्यांचा मेहुणा संजय नरसिंग गावीत (रा. बंदारवाडा, पो. सोनगीर फाटा, ता. नंदूरबार) यांची यामध्ये मोठी फसवणूक करण्यात आली होती. आरोपी रामेश्वरी जाधव हिचा पती नितीन जाधव याच्यावर शनिवारी (दि. २७) रोजी माळशिरस तालुक्यातील शाळेत शिक्षक भरतीसाठी १४ लाख रुपये घेऊन फसवणुकीचा गुन्हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यशोदीप कला-क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने सन (२०१२- २०१३ ) मध्ये शिक्षक व शिपाई या पदांची भरती करण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. वृत्तपत्रातील जाहिरात बघून फिर्यादीने आरोपी रामेश्वरी जाधव यांना संपर्क साधला होता. त्यानंतर फिर्यादी यांना बारामती नजिक कर्हावागज मधील मुकबधीर शाळेत बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर रामेश्वरी जाधव यांनी आमची  कर्हावागज, तसेच स्वामी समर्थ मूकबधिर शाळा बाळू पाटलाचीवाडी (लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) ही अनुदानित शाळा आहे. असे सांगत शिपाईपदा साठी दोघांकडून ९ लाख रुपये घेऊन तीन महिन्यांत तुम्हांला सरकारी नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल असे सांगण्यात आले होते.  त्यानंतर त्यांना स्वामी समर्थ निवासी मुकबधीर विद्यालय बाळू पाटलाचीवाडी येथे शिपाई पदाच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले होते. व चार वर्ष काम करून देखील पगार देण्यात आला नाही. या अगोदर देखील नितीन जाधव विरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच एका तरुणाला सैन्यदलात नोकरीस लावण्याच्या अमिषाने फसवणूक केल्याचा गुन्हा भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर नितीन जाधव, गणेश कमलाकर गोडसे (रा.कराड, जि. सातारा) या दोघांनी शिक्षक भरतीच्या नावाखाली १४ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बारामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.