‘समृद्ध जीवन’चा महत्वाच्या कागदपत्रांचा दुसरा साठा जप्त ;  हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक

शेतीला पुरक व्यावसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती

    पुणे : हजारो सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि शेतकर्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या समृद्ध जीवनने आजवर लपवून ठेवलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा दुसरा साठाही राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केला. समृध्द जीवनने आत्तापर्यंत लपवून ठेवलेल्या महत्वाच्या कागदपत्रांचा पहिला साठा आठवड्यापुर्वी नर्हे येथील एका सोसायटीत सापडला होता. त्यानंतर धायरी येथेही एका सदनिकेत मोठा कागदपत्रांचा साठा  सीआयडीच्या पथकाने जप्त केला.

    शेतीला पुरक व्यावसाय म्हणून शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्धा २२ राज्यात २८ गुन्हे दाखल आहेत.राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपूर्वी सीआयडी कडे देण्यात आला. या गुन्ह्यात एकूण २५ बड्या व्यक्तींचा सहभाग असून त्यापैकी १७ जणांना सीआयडीने यापुर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. तर ८ जण या प्रकरणा मध्ये फरारी आहेत. महेश मोतेवार सध्या ओरीसा राज्यातील कारागृहामध्ये आहे.

    सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिस उपअधिक्षक मनीषा धामणे पाटील यांचे पथकाने कागदपत्रांचा सलग दुसरा साठा जप्त केला.समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील लपवून ठेवलेली महत्वाची कागदपत्रे पुन्हा दुसरीकडे हलवली जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पथकाकडून टेम्पोंवर लक्ष ठेवण्यात आले होते.