दुसरी लाट अधिक धोकादायक, सहज घेऊ नका !

कोरोनाची दहशत वाढली आहे. ९० टक्के रिकव्हरी रेट असताना मला कोरोना झाला. आता माझा मृत्यू होईल, माझ्या कुटुंबाची सुरक्षा कोण करेल ? असे विचारांचे काहूर मनात घर करून बसते. परिणामी, सामान्य कोरोनाबाधित नैराश्यात जातात. यातूनच आत्महत्येचे विचारही मनात येतात. जनता कोरोना फोबिया या मानसिक आजाराच्या विळख्यात अडकत आहे.

  पिंपरी। कोरोना विषाणू संसर्गाची सध्याची लाट ही पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी एवढ्या सहजतेने वागू नये. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिक जोपर्यंत संवेदनशीलपणे, जबाबदारीने वागत नाहीत, तोपर्यंत त्याला अर्थ नाही. कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा स्थिती अधिक स्फोटक बनेल व त्याला आपण सर्वच जबाबदार राहू.

  तीन – चार महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी होती. मात्र, ढिलाईमुळे पुन्हा बाधित वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे खडबडून जागे व्हायची वेळ आली आहे. रुग्णालयांमध्ये खाटा मिळाव्यात, यासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. वायसीएम रुग्णालय, नवीन जिाजामाता रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय खचाखच भरले आहे. तेथे रुग्णांचा भार वाढला आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

  लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळायला हवी

  कोरोना रुग्णांची संख्या आता पूर्वीपेक्षा तिप्पट झाली आहे. मात्र, आजही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य केल्यास या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे. यासाठी लस घेतल्यानंतरही स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

  कोरोना प्रतिबंधात शिथिलता आल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम पिंपरी – चिंचवडमध्ये सध्या दिसून येत आहेत. दररोज दोन ते तीन हजार बाधित रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी महापालिकेने दररोज १० हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, कोरोनावर औषधोपचार आणि हमखास तोडगा नसल्याने नागरिकांनी जीवनशैलीमध्ये आलेली शिथिलता बदलण्याची गरज आहे.

  कोरोना फोबियाच्या विळख्यात अडकू नका

  कोरोनाची दहशत वाढली आहे. ९० टक्के रिकव्हरी रेट असताना मला कोरोना झाला. आता माझा मृत्यू होईल, माझ्या कुटुंबाची सुरक्षा कोण करेल ? असे विचारांचे काहूर मनात घर करून बसते. परिणामी, सामान्य कोरोनाबाधित नैराश्यात जातात. यातूनच आत्महत्येचे विचारही मनात येतात. जनता कोरोना फोबिया या मानसिक आजाराच्या विळख्यात अडकत आहे.

  यातून बाहेर काढण्यासाठी ‘मनोधैर्य क्लिनिक’ ही संकल्पना राबवण्यात यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोनाविषयी समाज माध्यमावर असंख्य पोस्ट्स फॉरवर्ड होत आहेत. कोरोनावरील उपचाराच्या औषधांपासून तर टीव्हीसमोर बसून इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमातील कोरोनाच्या आकडेवारीचा मांडलेला खेळ, यामुळे जनतेच्या मनात प्रचंड भय निर्माण झाले आहे. सामान्यत: सर्दी, खोकला असलेले नागरिकही डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी रांगा लावत आहेत. कोरोनाबाधेतून मुक्त झालेल्या नागरिकांकडून कोरोनातून बरा कसा झालो, यासंदर्भातील अनुभव कथन तसेच मानसोपचार तज्ज्ञ यांचे कोरोना आजाराबाबत समुपदेशन सुरू करण्याची गरज आहे.