महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा वाऱ्यावर; सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

निगडी बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या या उद्यानात प्रवाशांची नेहमीच उठबस असते. पण, याच ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात, याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे.

पिंपरी: पिंपरी चिंचवड़ मधील निगडी येथील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून वाऱ्यावर आहे. स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न नेमल्यामुळे या ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात, याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे. रात्रीही बऱ्याच उशिरापर्यंत काही प्रेमीयुगुल याठिकाणी बसलेले असतात. त्यामुळे या पुतळ्याचे पावित्र्य भंग होत आहे.

या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात हातागळे यांनी म्हटले आहे की, “निगडी बसस्थानकाशेजारील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोनदा लेखी पत्र देऊन २४ तास सुरक्षारक्षक नेमण्यासंदर्भात मागणी केलेली होती. तरीही, याची गांभीर्याने दखल घेतलेलीच नाही.

महाराणा प्रताप उद्यानात गेले कित्येक वर्ष सुरक्षारक्षकच नाही. मग कुणाच्या वरदहस्तामुळे येथे सुरक्षारक्षक नेमला जात नाही किंवा येथील सुरक्षारक्षक अधिकाऱ्यांच्या संगनमताने फक्त रजिस्टरवर हजेरी लावून जाण्याचे काम करतात का ? याचेही उत्तर मिळावे. बरीच वर्ष व महिन्यांपासून येथे कुणीही सुरक्षारक्षक अस्तित्वातच नाही. एवढ्या वर्दळीच्या आणि स्मारकाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकच नसावा यात काय गौडबंगाल असेल? याचीही आपण गांभीर्याने सखोल चौकशी करावी.

निगडी बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या या उद्यानात प्रवाशांची नेहमीच उठबस असते. पण, याच ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात, याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे. रात्रीही बऱ्याच उशिरापर्यंत काही प्रेमीयुगुल याठिकाणी बसलेले असतात. त्यामुळे या पुतळ्याचे पावित्र्य भंग होत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.