मोठी बातमी ! आमदार राहुल कुल यांच्या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

थकीत कर्ज परतफेड न केल्यास कारखाना बँक ताब्यात घेणार

    पुणे : भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याने पुणे जिल्हा बँकेचे तब्बल दीडशे कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे कर्ज परतफेड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण आता तीन वर्षांपासून साखर कारखाना बंद असून, सुरू होण्याची काहीच लक्षणे दिसत नाही. यामुळेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दीडशे कोटी थकबाकी वसुलीसाठी भीमा पाटस साखर कारखान्यावर जप्तीची नोटीस दिली आहे. थकीत कर्ज परतफेड त्वरीत न केल्यास कारखाना बँक ताब्यात घेईल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली. या कारवाईमुळे दौंड तालुक्यातील राजकारण पुन्हा पेटणार असल्याचे स्पष्ट झाले.

    दौंड तालुक्यातील भीमा पाटस साखर कारखान्याच्या बोगस कारभाराची माहिती देण्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा तथा दौंड तालुक्यातील नेत्या वैशाली नागवडे उपस्थित होत्या.

    यावेळी थोरात यांनी सांगितले की, सन २०१७ – २०१८ पासून भीमा पाटस साखर कारखाना बंद आहे. त्यापर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तब्बल ३६ कोटी रुपयांची मदत करण्यात आली. परंतु शासनाची मदत मिळवून देखील कारखान्याचे नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल कारखाना सुरू करू शकले नाही.