दोघांकडून घातक शस्त्रसाठा जप्त; पिंपरी पोलिसांची कारवाई

दुचाकीवरील दोघांची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका गोणीमध्ये एक लोखंडी तलवार, एक लोखंडी गुप्ती, एक लोखंडी कोयता व एक लोखंडी सत्तुर अशी घातक हत्यारे मिळाली. हत्यारे, दुचाकी, मोबाईल फोन, असा एकूण ३७हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    पिंपरी: चाकण शहरातील नगरपरिषद चौक ते देशमुख आळी या मार्गावरून पोलिसांनी एका दुचाकीचा पाठलाग केला. तब्बल तीन किलोमीटर पाठलाग करून दोघांना पकडले आणि त्यांच्याकडून घातक शस्त्रसाठा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली.

    योगेश भरत डोंगरे (वय २१, रा. शनिमंदिरा जवळ, चाकण) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस कर्मचारी संतोष सुरेश पंदरकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत नगर परिषद चौक चाकण येथे रात्र गस्ती दरम्यान चाकण शहर बिट मार्शलचे गस्तीवरील अंमलदार यांना एका दुचाकीवरून दोघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळले. पोलीसांनी दुचाकीला थांबण्याचा इशारा केला. पोलिसांनी थांबण्यास सांगूनही दुचाकीस्वार थांबला नाही. उलट पुन्हा वेगाने जाऊ लागला.

    त्यामुळे बिट मार्शलने दुचाकीचा चाकण शहराच्या गल्ली बोळातून सुमारे दोन ते तीन किलोमीटर पाठलाग केला. देशमुख आळी, चाकण येथे दुचाकी गाठली आणि दुचाकीवरील दोघांची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका गोणीमध्ये एक लोखंडी तलवार, एक लोखंडी गुप्ती, एक लोखंडी कोयता व एक लोखंडी सत्तुर अशी घातक हत्यारे मिळाली. हत्यारे, दुचाकी, मोबाईल फोन, असा एकूण ३७हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

    आरोपी डोंगरे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी डोंगरे याच्यावर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात सन २०२० ध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

    ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, पोलीस उप निरीक्षक विजय जगदाळे, महिला पोलीस उप निरीक्षक प्रियांका साळुंखे, पोलीस कर्मचारी बजरंग साबळे, हनुमंत कांबळे, संतोष पंदरकर, मंगेश फापाळे, प्रेमकुमार पावडे, होमगार्ड भोकसे, कलेवडे, ग्रामसुरक्षा दलाचा जवान दिनेश सांगडे यांनी केलेली आहे.