शहरातील ज्येष्ठ नागरिकांची होणार तपासणी

पुणे : शहरातील करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच करोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठीप्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिका शहरातील ज्येष्ठ

पुणे : शहरातील करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच करोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठीप्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिका शहरातील  ज्येष्ठ नागरिकांची  घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

शहरात साथीची लागण झालेल सर्वाधिक रुग्ण हे वय वर्षे 40च्या पुढील आहेत. याशिवाय, देशभरात तसेच जगभरात या आजाराची लागण झालेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे

कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना असून अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण कोरोनामध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना होणारा संभाव्य धोका टाळण्याकरिता महापालिका विशेष मोहीम राबविणार आहे. ज्येष्ठ नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी केली जाणार आहे.

आतापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी जवळजवळ ८९ टक्के मृत्यू एक किंवा एकापेक्षा जास्त व्याधी असलेल्या रूग्णांचे आहेत. जिल्ह्यातील एकूण मृत्यूंपैकी ५६ टक्के मृत्यू हे ६१ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे झालेले आहेत. तसेच २१ टक्के मृत्यू हे ५१ ते ६० वयोगटातील व्यक्तींचे झालेले आहेत. म्हणजेच ७७ टक्के मृत्यू हे ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे व १५ टक्के मृत्यू हे ४१ ते ५० वयोगटातील व्यक्तीचे झालेले आहेत. १४ टक्के मृत्यू हे २४ तासांच्या आत झालेले आहेत आणि १४ टक्के मृत्यू हे २४ ते ७२ तासांमध्ये झालेले आहेत. मृत्यूचे प्रमाण हे जेष्ठ नागरिक व इतर व्याधीग्रस्त व्यक्तींमध्ये जास्त आहे. त्यामुळे व्याधीग्रस्त व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. विशेषत: रक्तदाब, मधुमेह, अस्थमा अथवा क्षयरोग, मूत्रपिंड, लठ्ठपणा, कर्करोग यासारखे आजार असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. पालिका आता अशा ज्येष्ठांची यादी तयार करणार आहे. त्यासाठी पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाची आणि शहारातील ज्येष्ठ नागरिक संघांची मदत घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाची मतदार यादी, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेची यादी, आरोग्य खात्याने केलेले सर्वेक्षण अशा महितीचीही मदत घेतली आहे.

———-